बहिणीच्या मुलीच्या मुलाने घडविले आजीचे हत्याकांड
खामगाव: तालुक्यातील उमरा-लासुरा येथील ६५ वर्षीय वृध्द महिलेच्या हत्येचे गुढ उकलण्यात पोलीसांना अखेर यश आले. वृध्देची हत्या बहिणीच्या नातवाने त्याच्या मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत, पुढील कारवाई सुरू केला आहे.खामगाव तालुक्यातील उमरा- लासुरा येथील कमलबाई जनार्दन सोनोने या वृध्द महिलेची शुक्रवारी गळादाबून निर्घुन हत्या करण्यात आली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे आरोपी हा नात्यातीलच असावा असे काही सुगावे खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या हाती लागले. त्यादिशेने पोलिसांनी तपास सुरू केला असता वृध्द महिलेच्या बहिणीच्या नातवाने (मुलीच्या मुलाने) आपल्या अल्पवयीन मित्राच्या साहाय्याने आजीचे हत्याकांड घडविल्याचे समोर आले. मंगेश राजेश रोकडे (१७, रा. उमरा लासूरा) आणि आशीष अरूण उमाळे (१७, रा. उमरा लासूरा) अशी आरोपींची नावे असून दोघांनाही ग्रामीण पोलिसांनी रविवारी अटक केली. दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्यामुळे दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे.