खामगांव : गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश काढले होते. त्यानुसार जिल्ह्यातील बहुतांश ठाणेदार यांच्या बदल्या जिल्ह्याबाहेर व काहींच्या जिल्ह्यांतर्गत झाल्या आहेत. अशातच खामगाव येथील दबंग ठाणेदार सुनील अंबुलकर यांची बदली जळगाव जामोद येथे झाली आहे, तर त्यांच्या जागेवर आलेले बीड जिल्ह्यातील परळी येथील प्रदीप त्रिभुवन यांनी कार्यभार सांभाळला आहे. कार्यभार सांभाळतात ठाणेदार प्रदीप त्रिभुवन हे शहरात चर्चेचा विषय बनले आहे. ठाणेदार त्रिभुवन यांनी कार्यभार सांभाळतात शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी रांगच लावली होती.

अनेक अवैध धंदे करणारे मोठमोठे पुष्पगुच्छ घेऊन ठाणेकरांच्या भेटीला पोलीस स्टेशनमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. अशातच शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला एक पोलीस कर्मचारी ठाणेदार आले त्या दिवसापासून त्यांच्या केबिनमध्ये श्री “गणेश” करत ठाण मांडून बसला आहे. त्या ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचारी विरुद्ध काही वर्षांपूर्वी पैसे घेताना एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओ वरुन फार मोठा गदारोळ पोलीस विभागात झाला होता. त्यानंतर तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी सदर कर्मचाऱ्याला निलंबित सुद्धा केले होते. मात्र काही महिन्यानंतर सदर कर्मचारी पुन्हा आपल्या कर्तव्यावर श्री “गणेश” करत रुजू झाला होता. त्यानंतरही त्या कर्मचाऱ्याने आपल्या अंगात असलेले नाविन्यपूर्ण गुण दाखवणे बंद केले नाही. अनेकांना निरनिराळ्या प्रकारे त्रास देणे त्याने सुरू ठेवले. त्याच्या या सर्व प्रकाराची तक्रार जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना अनेकदा दिली होती. मात्र त्या तक्रारींना जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे, अशी चर्चा तक्रारदार करताना दिसत आहेत. सदर कर्मचारी रेतीच्या गाड्यांचे हफ्ते सुद्धा जबरदस्तीने गोळा करत असल्याची चर्चा रेती वाहतूक दारामध्ये रंगू लागली आहे.

काही दिवसांअगोदर शहर पोलीस स्टेशनमधील एक महिला कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या सोबत श्री “गणेश” करून एका व्यक्तीला पैशाची मागणी केल्याची तक्रार सुद्धा पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली होती. सदर कर्मचाऱ्याची ठाणेदार सोबत वाढती जवळीक पाहतात अवैध धंदे करणाऱ्यांना अधिक ऊत आल्याचे दिसून येत आहे. तर काही अवैध धंदे करणाऱ्यांना मलाई वाढवून देण्याचे सुद्धा निरोप गेल्याची चर्चा शहरात नागरिकांमध्ये खमंग रंगू लागली आहे. त्या श्री “गणेश” कर्मचाऱ्याची मागची पार्श्वभूमी पाहता ठाणेदार प्रदीप त्रिभुवन दुर्लक्ष का करत आहेत याची चर्चा पोलीस स्टेशन आवारात कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. तात्काळ त्या कर्मचाऱ्यांची योग्य ती दखल घेऊन ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांनी लक्ष द्यावे अन्यथा ठाणेदार यांच्या खुर्चीवर सदर कर्मचारी मोठी गदा आणणार व त्यामुळे ठाणेदार यांनाच श्री “गणेश” करण्याची वेळ येईल अशी चर्चा जोरदार सुरू आहे. आतातरी वरिष्ठ अधिकारी या पोलीस कर्मचाऱ्यांचा श्री “गणेश” ची चौकशी करतील की त्याला वाऱ्यावर सोडतील हे पाहावे लागेल….
