खामगाव: खामगाव शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयममधील नादुरुस्त विद्युत स्ट्रीट लाईट दुरुस्त करावी तसेच ओंकारेश्वर स्मशानभूमीतील टिनशेड दुरुस्त करावे,अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा समाज सेवा मंडळाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.याबाबत नगर परिषद खामगाव मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून त्यात नमूद आहे की , छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील विद्युत लाईट मागील काही दिवसांपासून नादुरुस्त असून त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे कारण तेथे विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तसेच ओंकारेश्वर स्मशानभूमीमधील शेड हे जीर्ण झाले असून त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे . याबाबत लोकप्रतिनिधींना वारंवार कल्पना देवून सुध्दा त्यावर काहीच उपाय योजना करण्यात आल्या नसून नगर परिषद मुख्यधिकारी आपण याकडे लक्ष देवून समस्या सोडवाव्यात अन्यथा लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ खामगाव शहर व मराठा समाज सेवा मंडळ खामगावचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.