स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम
खामगाव : लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रभाग क्र. 6 चे नगरसेवक तथा ज्येष्ठ पत्रकार सतिषआप्पा दुडे यांनी आज आपल्या प्रभागातील सफाई कर्मचार्यांचा सत्कार करत त्यांना किराणा साहित्याचे वाटप केले. कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे साफ-सफाईचे काम करणार्या सफाई कामगारांबद्दल सद्भावना व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून नगरसेवक दुडे यांनी मागीलवर्षी देखील हा उपक्रम राबविला होता. यावर्षी देखील हा उपक्रम राबवत आज आ.अॅड. आकाश फुंडकर व नगराध्यक्षा सौ.अनिताताई डवरे यांच्या हस्ते प्रभाग क्र. ६ मधील सफाई कर्मचार्यांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोविड नियमांचे पालन करत सफाई कामगारांचा पुष्पहार घालून सत्कार करत त्यांना किराणा साहित्य देण्यात आले. नगरसेवक सतिषआप्पा दुडे यांनी केलेले हे काम खरोखर प्रशंसनीय आहे.

सफाई कामगार आजच्या कोरोनाच्या लढ्यातील फायटर्स आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मागील वर्षी देखील त्यांनी हा उपक्रम राबविला होता. हा खरोखर स्तुत्य असा उपक्रम आहे,अशी प्रतिक्रिया यावेळी आ.अॅड.आकाश फुंडकर यांनी व्यक्त केली. तर नगरसेवक दुडे यांनी सांगितले की, आपत्तीच्या काळातही जीव धोक्यात घालून सेवा करणार्यांप्रती आपलेही काही तरी देणे लागते. या भावनेतून लोकनेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा छोटासा उपक्रम राबविण्यात आला. यातून जे आत्मिक समाधान मिळते त्याचे कुठेच मोजमाप करता येत नाही, अशी समर्पक प्रतिक्रिया नगरसेवक सतिषआप्पा दुडे यांनी व्यक्त केली. यावेळी आ.अॅड. आकाश फुंडकर, नगराध्यक्षा सौ.अनिताताई डवरे यांच्यासह भाजपा शहराध्यक्ष शेखर पुरोहित, नगरसेवक सतिषआप्पा दुडे, नगरसेविका सौ.संतोषदेवी पुरोहित, संतोष डिडवाणी, कृष्णा ठाकूर, दिलीप गुप्ता आदींची उपस्थिती होती.