कोरोना चा मोठा फटका देहविक्री व्यवसायालाही
बुलडाणा : कोरोनाचा फटका हा सर्वांनाच बसलाय या परिस्थितीतही शासनासह अनेक सामाजिक संस्थांकडून मदतीचे हात पुढे येत आहेत. मात्र यातही समाजात देहविक्री करणारा एक घटक आहे जो या बिकट परिस्थितीत दुर्लक्षित राहिला आहे.
वेगवेगळ्या परिस्थितीतून पर्यायाने आलेल्या ह्या महिला आहेत, बुलडाणा जिल्ह्यातील काही निवडक तालुक्यात ह्या महिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी हा व्यवसाय करतात. एक मानव जात म्हणून यांना देखील मदतीचा आधार देण्याची गरज आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर, खामगाव, बुलडाणा सारख्या काही निवडक शहरात वारांगना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी देहविक्री चा व्यवसाय करतात, जिल्ह्यात पस्तीस ते चाळीस महिला हा व्यवसाय करत असून त्यांची नियमित आरोग्य तपासणी देखील संबंधित यंत्रणेकडून केली जाते, मात्र या कोरोना च्या परिस्थिती मध्ये सोशल डिस्टन्स, फिजिकल डिस्टन्स पाळला जातोय त्यामुळे थेट शरीराशी संबंध येत असलेल्या या व्यवसायातील महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे, एक वेळ जेवण करून हा समूह आपली उपजीविका भागवत आहे. आता लॉकडाऊन संपला तरी देखील समोरचे काही महिने तरी ग्राहक यांच्याकडे जाण्यासाठी धास्तावणार नाहीत हे ही तेवढेच खरे आहे. त्यामुळे या महिलांनी जगावं तरी कसं असा प्रश्न उपस्थित होतोय.
हा व्यवसाय सुरू आहे म्हणून तरी महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण कमी होते अश्या भावना देखील काही वारांगना नी व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे एक मानव म्हणून आणि माणुसकी म्हणून या समूह साठी मदतीचा हात पुढे येणे गरजेचे आहे.