नांदुरा : स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज १९ फेब्रुवारीला शिवजयंती संपूर्ण राज्यात, देशात नव्हे संपूर्ण जगात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. परंतु या वर्षी कोविड-१९ चे संकट असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांवर सरकारने निर्बंध घातल्यामुळे साध्या पद्धतीने, शांततेत पण मोठ्या मनोभावे व उत्साहात घरोघरी शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. नांदुरा येथील रामराव देशमुख यांच्या परिवारातही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ती आगळीवेगळी आणि आदर्श अशी शिवजयंती म्हणावी लागेल. रंगीबेरंगी कापड, कागद पाने-फुले, चित्र, वस्तू, छोटी झाडे इत्यादींचा वापर करून सुशोभित केलेल्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा विराजमान करण्यात आली. मोहक व प्रेरक अशा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीच्या सभोवती इतिहासातील घटनांची सुरेख अशी मांडणी करण्यात आली. शिवशाहीतील प्रेरक प्रसंगांना चित्रांच्या माध्यमातून उजाळा देण्याचा प्रयत्न यातून केला गेला आहे. शिवचरित्रातील अफजल खानाची भेट, शाहिस्तेखानाची फजिती, शिवरायांचा जन्म व मृत्यू या बद्दल भाषण, व्याख्यान, चित्रपट आदींद्वारे नेहमीच सांगितले जाते परंतु याशिवायही शिवचरित्रामध्ये अनेक असे प्रसंग व घटना आहेत ज्या सर्वान पर्यंत पोहोचलेल्या नाहीत किंवा अनेकांना त्या माहित नाही. परंतु त्या काही प्रेरक, मार्गदर्शक गोष्टी, छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श राज्य व्यवस्था व लोककल्याणाचे कार्य शिवजन्म उत्सवाच्या निमित्ताने दाखविण्यात प्रयत्न देशमुख परिवारातून जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. सुंदर अशी सजावट करून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विश्ववंदनीय अशी राजमुद्रा, पाण्याची व्यवस्थापन व पर्यावरणाचे रक्षण याबद्दलची शिवरायांनी घेतलेली , स्वराज्याची प्रतिज्ञा आणि मोठ्या कष्टाने , प्रयत्नाने स्थापन केलेले स्वराज्य व त्यानंतर झालेला राज्याभिषेक ही क्रांतिकारी घटना, शिवरायांनी पुण्याच्या भूमीत सोन्याचा नांगर फिरवून अंधश्रद्धा मोडीत काढली, भूमी पवित्र केली व प्रजेला धीर दिला, स्वराज्याच्या रक्षणार्थ शिवरायांची जागरूकता व दूरदृष्टी यातून त्यांनी केलेली आरमाराची निर्मिती, शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या शिवरायांनी जोपासलेले शेतकऱ्यांचे हित व त्यांना केलेली मदत, जिजाऊंनी शिवबांवर केलेले संस्कार, शहाजीराजांनी शिवरायांसाठी उपलब्ध करून दिलेले शिक्षण व दिलेले प्रोत्साहन, जगतगुरु संत तुकाराम यांच्या कीर्तनाचा लाभलेला सहवास व मार्गदर्शन, तानाजी मालुसरे यांच्या प्रमाणे शिवराय व स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे मावळे, तोफ व भाले, इत्यादी अशी काही त्यांच्या जीवन व कार्य तील वेगळी दिशादर्शक घटना सजावटीतून साकारून आदर्श पद्धतीने शिवजयंती सोहळा देशमुख परिवारात साजरा करण्यात आला. शिवचरित्र साकारण्याचा त्यांचा प्रयत्न हा प्रशंसनीय आहे त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने शिवचरित्र अधिक सुस्पष्टपणे समजून घेण्यासाठी होईल यात शंका नाही. शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन रामराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, सजावटी ची संकल्पना निलेश देशमुख यांच्या कल्पनेतून साकारले असून कुटुंबातील सदस्यांचे त्यासाठी सहकार्य लाभले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा यावेळी जय जय कार करण्यात आला. कार्यक्रमाला मंगेश देशमुख, इंदुबाई देशमुख, शितल देशमुख अनिता देशमुख, आरोही देशमुख, अर्णव देशमुख, अद्विक देशमुख, यशवंत देशमुख यासह कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.