सलून दुकान बंद, मग ‘नाभिकाने’ जगायचं कसं….
खामगांव : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा वाढता आकडा पाहता राज्य सरकारने मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिलेल्या या निर्बधाच्या विरोधात आज खामगाव शहरातील नाभिक समाजाच्या वतीने नायब तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. नाभिक समाजाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शासनाच्या आदेशा प्रमाणे राज्यात ब्रेक द चेन नावाखाली अंशतः लॉकडाऊन जाहीर केलेले आहे. सदर आदेशामध्ये अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आलेली आहे. परंतू याच्या व्यतिरिक्त सलून व पार्लर यांचा व आधारित कर्मचाऱ्यांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. आत्यावश्यक सेवांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यवसायिकाचा विचार न केल्यामुळे त्यांना लागू असलेले भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार, त्यांच्यावर आधारित त्यांचे कुटुंबिय, आस्थापनाला लागणारे इले. बिल, याचा कोणताही विचार शासनाने किंवा आपण शासनाच्या आदेशा प्रमाणे काढलेल्या आदेशामध्ये करण्यात आलेला नाही व त्यामुळे सर्व सलून व पार्लर बांधवांवर अन्याय होवून त्यांनी त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांचा विचार न केल्यामुळे अन्याय होवून सलून व पार्लरवाले हे कर्जबाजारी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. शासनाने ठरवून दिलेल्या आदेशानुसार व निर्देशानुसार प्रत्येक पार्लर, सलून व त्यावर अवलंबून असलेल्या कर्मचा-यांनी कोरोना टेस्ट तर केलीच आहे व उलट वैक्सीन घेत आहेत. तसेच मास्क घालणे, ग्राहकांना सेनिटायझरची व्यवस्था, सोशल डिस्टंसींगचे सुध्दा पालन करीत आहे.शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून लॉकडाऊन ला सहकार्य करत आहे, परंतु लॉकडाऊन मुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत व हात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतो त्यामुळे सदर लॉकडाऊन लागल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ व आत्महत्येची पाळी आली आहे. उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांवर आता काय करावे हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.य्या सर्व बाबींचा विचार करून सलून व पार्लर व्यवसायिकांना दुकान उघडण्यासाठी परवानगी देण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदन देतांना यावेळी जिल्हाध्यक्ष मंगेश माळी, शांताराम तायडे, अशोक पिंपळकर ,कैलास अंबुसकर, भास्करराव बेलोरकर, संतोष अंबुलकर, विलास वाशीमकर, विजय माळी ,गणेश खाकरे, गणेश माळी ,गजानन कळमकर ,विठ्ठल तायडे , विजय धमेलिया, सुधाकर पळसकर ,गणेश पिंपळकर, राजेश श्रीवास्तव ,राजू पर्वते यांच्यासह आदी नाभिक बांधव उपस्थित होते.