खामगांव : एकीकडे राज्यात कोरोना मुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे तर दुसरीकडे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये अनेक बेकायदेशीर व नियमबाहय कामांची मालीका सुरु असल्याचे दिसून येत आहे. संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी दिलेल्या माहितीनुसार बाजार समितीचा कार्यकाळ 23 जुलै रोजी संपणार असल्याने बाजार समितीचे सभापती व सचिव हे सर्व नियम धाब्यावर बसवुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करीत आहे. खामगांव अर्बन को-आॅप. बँक काॅटन मार्केट शाखा यांच्या लगत असलेले खामगांव कृ.उ.बा.स.च्या मालकीचे अडते-व्यापारी यांच्या साठी राखीव ठेवण्यात आलेले 16 खुले प्लाॅट सभापती संतोष टाले व सचिव भिसे यांनी मोठा भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने काही अडते, व्यापारी यांची दिशाभूल करुन बेकायदेशीररित्या खोटे दस्तऐवज तयार करुन ते खुले प्लाॅट भाडेपटट्याने देण्याचे काम हे करत आहे असा आरोप माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा व संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी केला आहे.
त्याबाबतची कागदोपत्री हर्राशी प्रक्रिया जनता कर्फ्युमध्ये सुटीच्या दिवशी काल सकाळी 11 वाजता बाजार समितीमध्ये ठेवली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सदर बैठक ही सभापती संतोष टाले यांच्या वैयक्तिक कारणामुळे पुढे ढकलण्यात आल्याची नोटिस कृ.उ.बा.स.च्या बोर्डावर लावण्यात आली आहे. या हर्राशीचा कुठल्याही प्रकारचा ठराव घेण्यात आला नसल्याची माहिती आहे.काल फक्त हर्राशी च्या 22 लोकांच्या पावत्या चुपचाप फाडण्यात आल्या तर काही संचालकांना हर्राशी काल होती याची माहिती सकाळीच भेटली आहे असे सुद्धा सांगितले. या बाबत सचिव यांना विचारणा केली असता सर्व संचालकांना सभापती यांनी हर्राशी बाबत कळवण्यात आले आहे. व सर्वांचे बहुमत असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. बाजार समितीच्या मालकीचे ओपन प्लाॅट, दुकाने भाडेपटट्याने देण्याकरीता सभापती संतोष टाले यांनी घेतलेल्या निर्णयास मान्यता करण्याबाबतचा विषय सुचीवरील विषय क्रं.18 हा 12 जुलै 2020 रोजीच्या सर्व साधारण सभेमध्ये घेण्यात आलेला आहे. 12 जुलैच्या या बेकायदेशीर सभेला व या विषयाला कृ.उ.बा.स.चे संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी आवाहन दिल्यामुळे बाजार समितीच्या सर्व साधारण सभेबाबतची सुचना पत्र दि.02/07/2020 च्या अन्वये दि.12/07/2020 रोजी आयोजित केलेल्या सभेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याचा लेखी आदेश दि. 08 जुलै 2020 रोजी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था,
अमरावती यांनी दिला आहे. यामुळे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पुर्ण न करता केवळ भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने 16 खुले प्लाॅटची हर्राशी करणे ही बाब विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था ,अमरावती यांच्या आदेशाची अवमान केल्याचा आरोप सुद्धा श्रीकृष्ण टिकार यांनी सांगितले आहे. बाजार समितीतील खामगांव अर्बन बॅंकेच्या शाखेला लागुन असलेले हे प्लाॅट राष्टीय महामार्ग क्रं.6 लगत असल्यामुळे नगर परिषद बांधकाम नियमावलीप्रमाणे या ठिकाणी असलेल्या या 16 खुल्या प्लाॅटवर बांधकाम परवानगी मिळू शकणार नाही याची सर्व माहिती असून सुद्धा सभापती व सचिव यांचा गलथन कारभार सुरु आहे असे आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व संचालक श्रीकृष्ण टिकार यांनी केला आहे. आता पुढील हर्राशी केव्हा होईल याची माहिती सचिवानी सांगण्यास नकार दिला हे विशेष..