खामगाव तालुक्यातील सर्वच तलावात केले बीजारोपण
खामगांव : जिल्ह्यात कमळाचे रान फुलवण्यासाठी एका शिक्षकाची धडपड नव्हें तर जिवाचं रान केलंय असेच म्हणावे लागेल. कारण खामगावच्या संजय गुरव या शिक्षकाने खामगाव तालुक्यातल्या प्रत्येक तलावात शेकडो कमळांचं रोपण केले आहे. संजय गुरव हे शिक्षक जरी असले तरी फुलांची विशेषता कमळाच्या फुलांची त्याना आवड आहे. म्हणूनच की काय या ध्येयवेड्या शिक्षकाच्या या अनोख्या उपक्रमानं त्यांची” कमळकंदवाले बाबा ” अशी त्यांची ओळख तालुक्यात निर्माण झालीय. मन मोहित करणारे आणि ‘राष्ट्रीय फूल’ म्हणून नावलौकीक असलेले कमळ फूल काहीसे दुर्लक्षीत असेच आहे. मात्र, खामगावातील एका ध्येयवेड्या शिक्षकाने कमळाला आपलेसे केले असून, स्वत:च्या टेरेसवर कमळाची आलिशान बाग फुलवली. इतकेच नव्हे तर परिसरातील ‘तलाव तिथे कमळ’ या उपक्रमाच्या माध्यमातून खामगाव तालुक्यातील सर्वच तलावात विविध जातींची कमळ फूल पोहोचविली आहेत. जिद्द चिकाटी आणि परिश्रमाच्या त्रिसुत्रीतून ध्येयवेड्या शिक्षकाचा उपक्रम आता नजीकच्या अकोला, वाशिम आणि जळगाव जिल्ह्यात पोहोचला आहे. त्यामुळेच पर्यावरण रक्षक आणि पक्षीमित्र असलेल्या या शिक्षकाची हौस आणि छंदाला निसर्गनिर्मितीने फुलवणारा अवलिया म्हणजे संजय गुरव अशी नवी ओळख सर्वदूर तयार होत आहे.
एका कमळाच्या कंदापासून त्यांनी आपल्या घरावरील कमळ बागच फुलविली. नव्हे तर, परिसरातील तलावातही कमळ कंदाचे रोपण केले. गुरव यांच्या तलाव तिथं या उपक्रमामुळे परिसरातील निसर्गप्रेमींना अनेक प्रकारची कमळे पाहायला मिळतात. घरावरील कमळ टेरेस बाग आणि परिसरातील तलाव कमळमय करण्यासाठी संजय गुरव यांनी शास्त्रशुध्द अभ्यास केला. मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ या राज्यासोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून कमळकंद आणि बिजांचे संकलन केले. अकोला जिल्ह्यातील भिकूंड नदीपात्रातील नैसर्गिक कमळाचीही बाग संजय गुरव यांनी फुलविली असून, खामगाव आणि परिसरातील अनेक तलावात या कंदांचे रोपण केले आहे. त्यांच्या बीज संकलन आणि कंद संकलन उपक्रमाला आता अनेक निसर्गप्रेमींची साथ लाभत आहे. तसे कमळ हे राष्ट्रीय फूल जरी असले तरी राजकीय दृष्टीने हे फुल एका राजकीय पक्षाचे चिन्ह देखील आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राजकीय पक्षांला सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल. मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने आणि तलाव सौंदर्यकरण च्या दृष्टीने गुरव यांनी उचललेले हे पाऊल नक्कीच वाखान ण्याजोगे आहे. इतरांनी सुद्धा गुरव यांचा आदर्श घेतल्यास पर्यावरणाला फायदा होईल.