खामगाव– आज संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा करीत आहे. असे असतांनाही भारतवासी विविध समस्यांचा सामना करून त्यावर मात करीत आहेत. यामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारी. परंतु तरूणांनी हताश न होता आत्मनिर्भर होऊन बेरोजगारीवर मात कशी करावी या दृष्टीकोनातून स्थानिक श्री तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून नाट्यरूपी देखावा सादर करण्यात येत आहे. यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच पारतंत्र्यात असताना देशातील थोर महापुरूषांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी केलेले परिश्रम तव्दतच त्यांनी देशातील तरूणाईला दिलेला सूचक संदेश या नाट्यरूपी देखाव्यातून मिळत आहे.
या नाट्यरूपी देखाव्याचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष आमदार ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते 2 सप्टेंबर रोजी करण्यात आले. सदर नाट्यरूपी देखाव्याची संकल्पना मंडळाचे सचिव ओंकारआप्पा तोडकर यांची असून संवाद लेखक सौ. शुभलक्ष्मी ओंकारआप्पा तोडकर व सौ. ऋचा प्रसाद तोडकर आहेत. तर दिग्दर्शक सौ. चिन्मयी स्वामी, सह दिग्दर्शक अंकूश काणे आहेत. कलाकार कृष्णा भराटे-सोन्या, भूमि खंडागळे- आजी, सार्थक मोहिते- आजोबा, अतुल काळे- गांधीजी, कुणाल खंडागळे-डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सार्थक वाघ- राजगुरू, उर्वशी जाधव- झांशीची राणी, योगेश ईर- नेताजी सुभाषचंद्र बोस, ईशा भराटे-सावित्रिबाई फुले, ओम चव्हाण- छत्रपती शिवाजी महाराज, अथर्व बागडे- शहीद भगतसिंह यांची भूमिका साकारत आहेत.सदर नाट्यरूपी जिवंत देखावा विशेष आकर्षण ठरत असून गणेशभक्त देखावा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. श्री तानाजी व्यायाम शाळेच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान दरवर्षी विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.