November 20, 2025
बातम्या

तमाम महाराष्ट्र सैनिकांना राज ठाकरे यांचे पत्र

आज खूप दिवसांनी माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांशी मी पुन्हा थेट संवाद साधतोय ह्याचा मला मनापासून आनंद होत आहे. मार्च महिन्यात कोरोनाचं संकट राज्यावर आणि देशावर येऊन कोसळलं आणि उत्तरोत्तर ते अधिक गडद होत गेलं. आजही त्याची तीव्रता कमी झाली आहे असं नाही. पण मागे मी एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हटलं होतं त्याप्रमाणे जोपर्यंत ह्या आजारावर योग्य औषध सापडत नाही तोपर्यंत आपली कोरोना साथीसोबत जगण्याची तयारी मनाने करावी लागेल आणि सध्या एकूणच महाराष्ट्राने तशी तयारी केलेली दिसते.

गेल्या २, ३ महिन्यांच्या काळात येणाऱ्या बातम्या मन विषण्ण करणाऱ्या होत्या. फक्त त्यात एकच दिलासा देणारी बाब माझ्यासाठी असायची ती म्हणजे ह्या कठीण प्रसंगात माझा महाराष्ट्र सैनिक जीवावर उदार होऊन, मोठ्या प्रमाणावर पदरमोड करून, लोकांच्या मदतीला धावून जातोय ही. अन्नधान्य वाटपापासून ते रुग्णांना इस्पितळात बेड मिळवून देणाऱ्या ते रुग्णाच्या कुटुंबियांना धीर देऊन प्रत्येकाच्या गरजेला उभा राहणाऱ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहचायच्या आणि त्या ऐकताना मला एकाच वेळेस आनंद आणि अभिमान दोन्हीही वाटत रहायचा.

महाराष्ट्र सैनिकांनी ह्या काळात केलेल्या कामाचं कौतुक मला अनेक लोकांनी व्यक्तिशः कळवलं, मी मनापासून सांगतो की मी खरंच भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखे सहकारी मिळाले. बरं, हे करत असताना रोज माझा महाराष्ट्र सैनिक स्वतःचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत होता, कित्येक महाराष्ट्र सैनिकांना कोरोनाची लागण देखील झाली तरीही ना माझा महाराष्ट्र सैनिक मागे हटला ना त्याचे कुटुंबीय. ही ताकद येते ती महाराष्ट्रावरच्या निस्सीम आणि निर्व्याज प्रेमातून. तुमच्या ह्या ताकदीला आणि तुमच्या कुटुंबियांच्या धैर्याला आणि त्यागाला माझा सलाम.

आणि हो, १४ तारखेला माझ्या वाढदिवशी तुम्ही सगळे दरवर्षी मला शुभेच्छा द्यायला येता, पण ह्या वर्षीची परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत, कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली नाही, थोडक्यात सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं अजिबात उचित नाही आणि म्हणूनच पक्षातील सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांना माझा सूचनावजा आदेश आहेत की कोणीही मला शुभेच्छा द्यायला येऊ नका. तुम्ही जिथे आहात तिथे जनतेला मदत करा, दिलासा द्या ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत.

बाकी महाराष्ट्रातील जनतेसाठी तुमचं सुरु असलेलं मदतकार्य नक्की चालू ठेवा पण हे करताना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवाची काळजी घ्या, तुमच्या जीवापेक्षा मला अधिक मोलाचं काहीच नाही.

सगळं सुरळीत झाल्यावर मी तुम्हाला भेटायला येणार आहेच, तेंव्हा तुमच्याशी भेट होईलच.

आपला नम्र,

राज ठाकरे.

Related posts

जिल्हयात आज प्राप्त १६ रिपोर्ट ‘निगेटीव्ह’

nirbhid swarajya

अवैध दारु वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखा, पथकाने पकडले…..दोन आरोपीसह 4.71,850/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…..

nirbhid swarajya

अवकाळीने घेतला निष्पाप बालिकेचा बळी! भिंत कोसळून दगावली!!

nirbhid swarajya
error: Content is protected !!