खामगाव: नैसर्गिक आपत्तीने बळीराजा नेहमीच अडचणीत आला असून, सध्या रोहणा, वर्णा, काळेगाव परिसरातील मुख्य पीक असणाऱ्यां केळीचे घड जागेवरच पिकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.सततच्या नैसर्गिक आपत्तीला बळीराजा पूर्णपणे वैतागला असून हतबल झाला आहे. खामगाव तालुक्यातील वर्णा,कोन्टी, सारोळा, रोहणा, काळेगाव, पोरज, भालेगाव बाजार, ढोरपगाव, बोरजवळा परिसर हा बुलडाणा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो. कमी-अधिक जमीन असली तरीही बहुतेक शेतकरी केळीची लागवड करतात. मागील वर्षी दोन हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत शेतकऱ्यांच्या केळीला दर मिळाला तर यावर्षी पाचशे ते आठशे रुपये दरम्यानच दर मिळत आहेत.दर मिळत असताना, जुलै महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला.त्यामुळे केळीच्या बागांमध्ये पाणी साचून राहत असल्याने डासांचे प्रमाण भरपूर वाढले आहे.त्यामुळे केळी पिकांवर देखील रोग पसरत असून आँगस्ट महिन्यातील ढगाळ वातावरणामुळे केळीच्या उभ्या झाडांचे घड एका दिवसात पिकत आहे. एक एकर केळी लागवड केलेली असेल त्यापैकी किमान तीनशे ते चारशे घड हे जागेवरच पिकत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.