नवी दिल्ली : कोरोनामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीला धैर्यानं आणि जिद्दीनं तोंड देणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसला आपल्याच घरातून बेदखल केलं जात असल्याचं समोर येत आहे. या कठीण परिस्थितीतही केवळ कर्तव्य म्हणून अनेक डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, साफ-सफाई कर्मचारी असे अनेक जण घराबाहेर पडून आपली जबाबदारी पार पाडत असतानाच अशा अनेकांना आपण राहत असलेल्या कॉलनीत किंवा घरातच येण्यास स्थानिक नागरिकांकडून मज्जाव होत असल्याचं समोर येतंय.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर २२ मार्च रोजी सायंकाळी ५.०० वाजता अनेकांनी याच लोकांना ‘करोना कमांडर्स’ आणि ‘देशाची शक्ती’ म्हणत त्यांच्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या होत्या. परंतु, समाजातील काही लोकांमुळे या करोना कमांडर्सना अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे.
आपल्या घरात भाड्यानं राहणाऱ्या डॉक्टर, नर्सेसवर त्यांचे घरमालक घर सोडून जाण्यासाठी दबाव टाकत आहेत, असं समोर आलं आहे. याची तक्रार ‘एम्स’च्या डॉक्टरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे. ‘घरमालक घर सोडण्यासाठी दबाव टाकत आहेत. केवळ डॉक्टर नाही तर नर्स आणि पॅरामेडिकल स्टाफसोबतही असा दुर्व्यवहार सुरू आहे’ असं ‘एम्स’च्या ‘रेसिडन्ट डॉक्टर वेल्फेअर असोसिएशन’नं त्यांनी आपल्या पत्रात म्हटलं.
डॉक्टरांनी केलेल्या या तक्रारीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर डॉक्टरांना मज्जाव करणाऱ्या नागरिकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना च्या कठीण वेळेत आपला जीव धोक्यात घालून परिस्थितिशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी, पॅथॉलॉजीस्ट,पोलीस यांचे आभार मानले व या सर्वांना सहायता आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा असे नागरिकांना ट्विट द्वारे आवाहन केले आहे .
(https://twitter.com/AmitShah/status/1242494441501253632?s=03)