January 4, 2025
आरोग्य गुन्हेगारी ब्लॉग महाराष्ट्र मुंबई राजकीय

डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा बळी

मुंबई : कोरोनामुळे एका वर्षापूर्वी पुणे पोलिस दलामध्ये कार्यरत असलेल्या माझ्या मामांचे निधन झालं. तेव्हाची परिस्थिती खूप भीषण होती. पोलिस असून सुद्धा त्यांना त्यावेळी हॉस्पिटल मिळत नव्हते. ती वेळ पुन्हा कोणावर येऊ नये असे वाटत होते. पण अवघ्या एका वर्षानंतर पुन्हा आमच्या कुटुंबियांवर ती वेळ आली. आमच्या घरातील आणखी एक अतिशय जवळच्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. त्यांना कोरोना झाला होता पण योग्य उपचार मिळाले असते तर ते ठणठणीत बरेही झाले असते. पण डॉक्टरांच्या आणि हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झालाय. हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा आधार गेलाय. सध्याच्या परिस्थितीत हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर ताण आहे हे मान्य आहे. या परिस्थितीत ते खूप मोलाचे योगदान देत आहेत. पण काही हॉस्पिटल्स असे आहेत जे लोकांच्या भावनांशी आणि जीवांशी खेळत आहे. फक्त पैशांच्या मागे धावून एखाद्या निष्पाप व्यक्तीचा जीव घेत आहे. ही बोलण्याची वेळ एक पत्रकार असूनही माझ्यावर आलेय. कारण गेल्या काही दिवसांपासून आमचे कुटुंब ज्या परिस्थितीचा सामना करत आहे ते सांगणं ही कठीण झाले आहे. ठाण्यात राहणारे माझे मामा विजय भंडारे (वय ४९) यांना काही दिवसांपूर्वी ताप, कप आणि खोकल्याचा त्रास होत होता. फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी जी औषधं घेतली त्यामुळे त्यांना बरं सुद्धा वाटलं. पण पुन्हा दोन दिवसांनी त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना कोरोना तपासणी करायला सांगितली. त्यानुसार ते तपासणी करायला गेले पण त्यावेळी सगळीकडेच कोरोना तपासणीसाठी कीट नसल्यामुळे लॅब बंद होत्या. ठाण्यातील हिरानंदनीमधील एका लॅबमध्ये त्यांची तपासणी करण्यात आली. तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डायबिटीज असल्याने डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याचा सल्ला दिला. हॉस्पिलमध्ये बेड मिळण्याची मारामार होती. खूप प्रयत्न केले पण बेड मिळत नव्हता. बेड मिळवण्यासाठी सुद्धा प्रोसेस असते. ती प्रोसेस फॉलो केली आणि ठाणे वॉर रुमने त्यांना स्वस्तिक मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बेड असल्याचे सांगितले. मामांना कोरोना झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना कोरोना तपासणी करावी लागली. त्यांची दोन मुलं आणि पत्नी यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार या तिघांवर घरीच उपचार सुरु झाले. फक्त मामांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. घरातील इतर सदस्यांना हॉस्पिटलमध्ये जाता येत नव्हते आणि हॉस्पिटलमध्ये देखील नातेवाईकांना भेटायला परवानगी नव्हती. त्यामुळे फक्त फोनवरच त्यांच्या तब्येतीची विचारपूस होत होती. मामा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांची ऑक्सिजनची पातळी ९५ होती आणि एचआरसीटी टेस्टचा स्कोर १२ होता. कोरोनामुळे त्यांना त्रास होत पण त्यांची अवस्था एवढीही वाईट नव्हती. ते चालत हॉस्पिटलमध्ये गेले. स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये ५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण या सहा दिवसात त्यांच्यावर योग्य उपचार न झाल्यामुळेच त्यांना जीव गमवावा लागला. ५ दिवसांच्या उपचारा दरम्यान हॉस्पिटलमध्ये रोज दिवसांतून तीन ते चार वेळा फोन करुन मामांच्या तब्येतीबद्दल विचारपूर केली जात होती. डॉक्टर म्हणायचे उपचार सुरु आहेत. होतील बरे पण वेळ लागेल. मामांना कोरोना होता त्यांना थोडे इन्फेक्शन देखील झाले होते. पण त्यांना डॉक्टरांनी रेमडेसीवीर इंजेक्शन दिले नव्हते. मुळात रुग्णालयात दाखल झाल्या झाल्या त्यांना हे इंजेक्शन देणे गरजे होते आणि दिले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. पण डॉक्टरांनी का नाही दिले याची माहिती नाही. पण दिले नव्हते तर खोटं तरी बोलू नये. हॉस्पिटलमधील दोन डॉक्टरांशी बोलणं झालं दोघांची उत्तरं वेगवेगळी. एक म्हणाला दिले तर दुसरा म्हणाला आज देणार आहे. नक्की दिलं की नाही हेच कळेना. शेवटी एका नर्सशी माम्मींचं बोलणं झालं तिने सांगितलं त्यांना इंजेक्शनची गरज लागली तर आम्ही तुम्हाला फोन करुन सांगू. तुम्ही ते आणून द्या. सरकारने हॉस्पिटलला इजेक्शनचा पुरवठा केला जाईल असे सांगितले असताना सुद्धा हा हॉस्पिटलमध्ये काळाबाजार सुरु होता. सराकरी रुग्णालयातील कोरोना रुग्णांची अवस्था पाहता आम्ही मांमांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. पैशांचा कसलाही विचार केला नाही योग्य उपचार होऊन मामा घरी यावेत हीच अपेक्षा होती. पण डॉक्टरांनी खूप निष्काळजीपणा केला आणि तो या निष्पाप कुटुंबाला सध्या भोगावा लागत आहे. या हॉस्पिटलमध्ये आयसीयू होते पण व्हेंटिलेटर नव्हते. पण मामांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा त्यांना ऑक्सिजनची आणि व्हेंटिलेटरची गरज नव्हती. अचानक २१ तारखेला दुपारी डॉक्टरांचा फोन येतो की मामांची तब्येत जास्त खराब झाली आहे. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट सिस्टम लावले आहे. हॉस्पिटलने तोपर्यंत बिल तयार करुन ठेवले होते. आमचे काही नातेवाईक रुग्णालयात गेले तर मामांना खूपच त्रास होत होता. डॉक्टरांनी सांगितले व्हेंटिलेटरची गरज लागेल तुम्ही त्यांना ताबडतोब दुसऱ्या रुग्णालयात हलवा. एकतर बाहेरची परिस्थिती गंभीर आहे साधे बेड्स देखील मिळत नाही. त्यात मामांची तब्येत जास्त खालवल्यानंतर स्वस्तिक हॉस्पिटलवाल्यांनी हात वर करुन दुसरीकडे न्या असे सांगितले. हॉस्पिटलने ५ दिवसांचे बिल ४१,५०० रुपये केले होते. व्हेंटिलेटर बेड मिळेपर्यंत तुम्ही त्यांना इथे ठेवा पण लवकर त्यांना हलवा असे त्यांनी सांगितले. खूप प्रयत्न केले व्हेंटिलेटर मिळत नव्हते. अगदी ठाणे, मुंबई, नवी मुंबईपर्यंत सगळीकडे प्रयत्न केले. ५ ते ६ तासांच्या प्रयत्नांनंतर मामांना ठाण्यात व्हेंटिलेटर मिळाले. तोपर्यंत स्वस्तिक हॉस्पिटलने बिल वाढवून ९० हजार रुपये केले. एवढं बिल कसे झाले विचाले असता. मामांना आता इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या आहेत याचा खर्च आहे तो असे त्यांनी उत्तर दिले. खरं तर अवघ्या सहा तासांमध्ये ४१ हजारांचे बिल थेट ९० हजारांवर त्यांनी आणले होते. हा फक्त पैशांचा खेळ या हॉस्पिटलने केला. तसं पहायाला गेले तर स्वस्तिक हॉस्पिटलने योग्य उपचार करुन त्यांना बरं केलं असतं. पण निव्वळ पैशांच्या मागे धावून त्यांनी एका निष्पाप माणसाचा जीव घेतला. ऐवढंच नाही तर आधी पैसे द्या मगच तुमच्या रुग्णाला न्या अशा शब्दात डॉक्टरांनी सांगितले. मामांचा मोबाईल, क्रेडिट कार्ड हे हॉस्पिटलने त्यांच्याकडे ठेवून घेतले आणि उर्वरित पैसे दिल्यानंतर हे घेऊन जा हे सांगितले. आपल्या माणसाला व्हेंटिलेटर मिळाले यामुळे सर्वांनी मामांना आधी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. मामांना ठाण्यातील हॉरिझोन प्राईम हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. त्या रुग्णालयात गेल्या गेल्या आधी १ लाख रुपये डिपॉझिट भरायला लावले. मामांची प्रकृती खूपच खालावली होती डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटर लावले त्यावेळी साधारण रात्रीचे १२ वाजले होते. त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्यांना रेमडेसीवर इंजेक्शन दिले असलयाचे सांगितले आणि एक गोळी अर्जंट आणा असे सांगितले. संपूर्ण मुंबईमध्ये ती गोळी सर्च केली कुठेच मिळेना. शेवटी नायर रुग्णालयात मिळेल असे कळाले. साधारण २ वाजता डॉक्टरांना फोन करुन सांगितले गोळी मिळतेय आम्ही घेऊन येतो. तर डॉक्टरांनी सांगितले गोळी नका आणू आम्ही २ तासांमध्ये मामांचा व्हेंटिलेटर काढणार आहोत. ते वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे आम्ही प्रयत्न केले पण आता काहीच करु शकत नाही असे डॉक्टरांनी सांगितले. आम्ही डॉक्टरांना विनंती केली काही तरी करा पण त्यांना वाचवा. तर डॉक्टरांनी थेट उत्तर दिले आमच्याकडे येण्यापूर्वीच तुमच्या रुग्णाची अवस्था खूपच गंभीर होती. त्याची ऑक्सिजनची पातळी ३० होती. कोणाचे काय ऐकावे काहीच कळेना. स्वस्तिक हॉस्पिटलने सोडताना सांगितले होते मामांची ऑक्सिजन पातळी ८० आहे. म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी खोटं सांगितले. खरं तर स्वस्तिक हॉस्पिटलने चांगले असलेल्या माझ्या मामांचा जीव गेल्यानंतरच त्यांना दुसरीकडे हलवा असे सांगितले. या हॉस्पिटलने तब्बल ६ दिवस त्यांच्यावर उपचार केले पण त्यांनी साधी मामांची फाईल सुद्धा तयार केली नव्हती की त्यांच्यावर काय उपचार केले गेले. मामांना डिस्चार्च देताना एका लेटर हेडवर हाताने एका डॉक्टरांनी त्यांची समरी लिहून दिली. नक्की हे मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल म्हणण्या लायक आहे का? असं कोण देतं लिहून. दुसऱ्या हॉस्पिटलने डिपॉझिट केलेल्या १ लाखांमधील ५० हजार कापून घेतले. अवघ्या ५ तासांचे त्यांनी सुद्धा ५० हजार बिल केले. आम्हाला माणूस हवा होता पैशांचे काही नव्हते पण इथे पैसा तर पैसा गेला आमचा माणूस वाचला नाही. स्वस्तिक हॉस्पिटलने आमच्या सोन्यासारख्या मामांचा जीव घेतला. परिस्थिती गंभीर आहे पण रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा हॉस्पिटल आणि डॉक्टरांना काहीच अधिकार नाही. त्यांना पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार असताना सुद्धा ते रुग्णाच्या जीवाशी असे खोटं बोलून कसे काय खेळू शकतात. सगळे डॉक्टर वाईट असतात असे नाही सगळ्यांना माणूसकी नसते असे सुद्धा नाही. पण काही अपवाद असे आहेत जे आम्हाला अनुभवायला मिळाले. इथे फक्त पैशांचा बाजार आणि जीवाशी खेळ सुरु आहे. (डॉक्टरांशी फोनवर जे काही बोलणं झालं त्याचे रेकॉर्डिंग आमच्याकडे आहे.)माझी सरकारला एकच विनंती आहे आरोग्य व्यवस्थेवर ताण आहे. पण त्यामुळे कोणत्याही खासगी रुग्णालयाला कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यापूर्वी ते रुग्णालय त्या लायकीचे आहे की नाही. त्याठिकाणी असलेले डॉक्टर चांगले आहेत की नाही याची पाहाणी करावी. तसं पहायाला गेले तर स्वस्तिक हॉस्पिटल खूप मोठे नव्हते. या हॉस्पिटलमध्ये फक्त १० रुग्ण होते. (त्याठिकाणी असलेल्या नर्सने दिलेली माहिती) एवढे कमी रुग्ण असताना एखाद्या रुग्णाची प्रकृती इतकी गंभीर व्हावी तोपर्यंत डॉक्टर काय करत होते? हे हॉस्पिटलचे नुकसान नाही एका घराचा कर्ता व्यक्ती गेलाय. मामांची मुलं लहान आहेत त्यांचे शिक्षण सुरु आहे त्यांची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न सध्या सर्वांना पडले आहे. माझी फक्त एकच विनंती आहे अशाप्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळणारी आणि पैसे लुटणाऱ्या हॉस्पिटलला टाळे लावले पाहिजे. जेणे करुन अशा निष्पाप लोकांचा जीव जाणार नाही आणि एखाद्याच्या कुटुंबावर ही वेळ येणार नाही. या दु:खातून सावरणं खूपच कठीण आहे. माझ्या मामांच्या आत्म्याला शांती मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना!!!

(हॉस्पिटलचे नाव – स्वस्तिक मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटल, ठाणे – डॉक्टर – आसिफ आणि नरेंद्र.)
(दुसरे हॉस्पिटल – हॉरिझोन प्राईम हॉस्पिटल, ठाणे. डॉक्टर – किरण)

प्रिया विजय मोरे

Related posts

भाजप कार्यालयात पोलीस व शसत्रबल भरती साठी दोन दिवसीय मोफत ऑनलाईन अर्ज भरता येणार, लाभ घेण्याचे आवाहन…

nirbhid swarajya

मामासह दोन भाच्यांचा धरणात बुडून करून अंत….!

nirbhid swarajya

जिल्ह आरोग्य वैद्यकीय अधिकारी पवार यांची जलंब प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट…

nirbhid swarajya
error: Content is protected !!