शेगाव : येथील गजानन जिनिंग फॅक्टरीमध्ये चालकाने ट्रक उतरावर उभा केल्याने सदर ट्रक समोर जावून भिंतीला धडकला. भिंत पडल्याने याठिकाणी बसलेले तिघे जखमी झाले, पैकी एकाचा मृत्यू झाला. सदर घटना गुरूवारी रात्री येथील गजानन जिनिंग फॅक्टरी परिसरात घडली. मृतकाचा भाऊ शिवशंकर वानखडे यांनी शहर पो स्टे ला फिर्याद दिली. त्यानुसार चालकाने गजानन जिनिंग फॅक्टरीत उतारावर ट्रक उभा केला.हा ट्रक जिनिंगच्या संरक्षण भिंतीवर आदळला, भिंत पडून बाहेरच्या बाजुने याठिकाणी बसलेले कैलास वानखडे, संतोष कान्हेरकर, बाळू इंगळे, हे तिघेजण भिंतीच्या मलब्याखाली दबून गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी सईबाई मोटे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कैलास वानखडे याची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. मृतकास पत्नी, दोन मुल ,दोन मुली असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी सदरचा ट्रक जप्त करून पो स्टे ला लावला.व आरोपी ट्रक चालकाविरूध्द कलम 304 अ,336,337,338 भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला.पुढील तपास ठाणेदार संतोष ताले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अरूण मुंडे व सहकारी करीत आहेत
next post