कॅमेऱ्यात कैद झाले अनेक प्राणी
बुलडाणा : कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी सरकारने ‘लॉकडाऊन’ केल असून याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसत आहे. परंतु वन्यप्राण्यांसाठी हा ‘लॉकडाऊन’ पर्वणी ठरत असून माणसाला घरी रहावे लागत असताना वन्यप्राणी बिनधास्त मुक्त संचार करीत आहेत. अभयारण्यात मुक्त संचार करणाऱ्या याच प्राण्यांचे चित्र वनविभागाने टिपले आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘टी१ सी१’ या वाघाचाही समावेश आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव, बुलडाणा, मोताळा आणि चिखली या चार तालुक्याच्या मोठा भूभाग घनदाट वनाने आच्छादीत असून येथील जंगलात तृणभक्षी व मांसभक्षी प्राण्याची संख्या भरपूर आहे. येथील जंगल इतर राज्यांच्या घनदाट ज्ञानगंगा वनक्षेत्राशी जुळलेले असल्यामुळे हिंसक प्राण्यांसह सर्वच प्राण्यांचा वावर बघायला मिळत आहे. या घनदाट जंगलांना लागून गेलेले पक्के रस्ते व त्या रस्त्यावर प्रवासी आणि वाहनांची सतत ये-जा यामुळे वन्यप्राण्यांना मुक्तसंचार करणे कठीण झाले होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे एवढा बदल झाला की रस्त्यावर माणूस व वाहनांचे येणे जाणे बंद झाल्याने हे वन्यप्राणी आता स्वच्छंद विहार करताना नुकतेच वनविभागाने मागील काही दिवसात टिपलेली वन्य प्राण्यांची चित्रांवरून दिसून येते. यामध्ये नीलगाय, हरीण, कोल्हे, सांबर,मोर,बिबटे यासह यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘टी१ सी१’ या वाघाचाही समावेश आहे.
खामगाव- बुलडाणा राज्य महामार्गावर बोथा वन परिक्षेत्र चौकी नंतर येणारा परिसर व इतर काही ठिकाणी वन्यप्राण्यांचे कॅरिडोर असून या ठिकाणी ते एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी रस्ता ओलांडताना अनेकवेळा मानवी आक्रमणाला बळी सुध्दा पडतात. हीच परिस्थिती आतील भागातील जंगल परिसरात असून वन्यजीवांची शिकार होते. परंतु ‘लॉकडाऊन’मुळे वन्यप्राणी कदाचित स्वत: खूपच नशीबवान समजत असतील असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
‘लॉकडाऊन’मुळे रस्त्यावरुन लोकांचे व वाहनांची येण-जाणे बंद झाली त्यामुळे वाहनांतून निघणारा धूर जो हवेला प्रदूषित करीत होता तो नाहीसा झाल्याने आॅक्सीजनचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे हवेत वाढलेले आॅक्सीजन मानवी जीवनासह वन्यजीव पशू पक्ष्यांसाठी लाभदायी ठरत आहे. नैसर्गिकरित्या विचार केला तर ‘लॉकडाऊन’ करणे सृष्टी वाचविण्यासाठी मोलाचे योगदान करण्यासारखे आहे.