नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेल्या जेईई मेन्स आणि नीट या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा बारावीची परीक्षा दिलेल्या लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. जेईई मेन, ऍडव्हान्स्ड आणि नीट परीक्षांच्या तारखांसंदर्भात महत्त्वाची घोषणा आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी केली. जेईई-मेन परीक्षा १८ जुलै २०२० ते २३ जुलै २०२० या कालावधीत होणार आहे, असे डॉ. रमेश पोखरियाल यांनी सांगितले. नीट परीक्षादेखील २६ जुलै २०२० रोजी घेतली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षा ऑगस्ट २०२० मध्ये होणार आहे. सीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षा कधी घेतल्या जाणार याबाबतचा निर्णय येत्या १ ते २ दिवसांत जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती देखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी दिली. डॉ. पोखरियाल निशंक यांनी आज देशभरातील विद्यार्थ्यांशी वेबिनारद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी या तारखा जाहीर केल्या. विद्यार्थ्यांना या तारखा कळल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
देशभरातील आयआयटींमधील अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी JEE Main ही परीक्षा घेतली जाते. यंदा ९ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या NEET परीक्षेला यंदा १५ लाख ९३ हजारांवर विद्यार्थी बसले आहेत. या परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतल्या जातात.
देशातील विद्यापीठांमधील परीक्षा १ जुलैपासून घेणार. ऑगस्टपासून नवं सत्र सुरू करणार. कुठल्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, त्याचा आढावा घेण्याचे अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. जुलैनंतरही जर कुठल्या ठिकाणची परिस्थिती सामान्य नसेल तर तेथील आढावा घेऊन तसे निर्णय घेण्यात येतील, असे पोखरियाल म्हणाले.