January 4, 2025
आरोग्य खामगाव जिल्हा बुलडाणा महाराष्ट्र मुंबई राजकीय

जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे – डॉ राजेंद्र शिंगणे

रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी

किरकोळ व घाऊक विक्रेत्यांकडे आलेल्या रेमडेसिवीर औषधांची तपासणी करावी

लसींसाठी पाठपुरावा करीत लसीकरणाचा वेग वाढवावा

बुलडाणा (जिमाका) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचा वेग जास्त आहे. त्यामुळे क्रियाशील रूग्णांचे प्रमाणही वाढले आहे. क्रियाशील रूग्णांपैकी ऑक्सिजनची गरज असणारे रूग्णही वाढले आहे. परिणामी जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी वाढती असून मागणी व पुरवठ्याचे प्रमाण सम राखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यंत्रणांनी ऑक्सिजन निर्मिती प्लँट तातडीने सुरू करून जिल्ह्याला ऑक्सिजन निर्मिती व पुरवठ्यामध्ये स्वयंपूर्ण बनवावे. अन्य जिल्ह्यातून ऑक्सिजन मागण्याची वेळ येवू देवू नये, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी दिल्या. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात 1 मे रोजी कोविड संसर्ग नियंत्रण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना पालकमंत्री बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जि.प अध्यक्ष मनीषा पवार, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहीरे आदी उपस्थित होते. रेमडेसिवीर औषधांचे वितरण आता जिल्हाधिकारी कार्यालयातून रूग्णालयांना होत असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, रेमडेसिवीर औषधाचा काळाबाजार करणाऱ्यांचा शोध घ्यावा. काळाबाजार करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करावी. रेमडेसिवीर औषधांच्या रिकाम्या कुप्यांची योग्य विल्हेवाट लावावी. इंजेक्शन दिलेल्या रूग्णांचे नाव, हॉस्पीटलचे नाव आदींचे रेकॉर्ड ठेवावे. जेणेकरून काळाबाजार होणार नाही. रेमडेसिवीर वितरण करताना रूग्णालयातील बेडची संख्या गृहीत धरावी. घाऊक व किरकोळ विक्रेत्यांकडे रेमडेसिवीर औषध येत असल्यास त्याची तपासणी करावी. औषधाचा अपव्यय होवू देवू नये. घाऊक विक्रेत्यांना रेमडेसिवीर देण्यासाठी कंपन्यांशी चर्चा करू. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लँट तातडीने सुरू करणेबाबत सूचना करीत पालकमंत्री म्हणाले ऑक्सिजन पुरवठा वेळेवर व सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करावी. पुरवठ्यामध्ये अडचणी असू नये. लिक्वीड ऑक्सिजन टँकमधून ड्युरा व जम्बो सिलेंडर भरण्यासाची सुविधा सुरू करावी. त्यामुळे बुलडाणा येथेच ऑक्सिजन भरला जाईल. तालुकास्तरावरील कोविड केअर सेंटरसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देण्यात यावे. जळगांव जामोद येथील कोविड हॉस्पीटल तातडीने सुरू करावे. त्या भागातील रूग्णांना तेथेच उपचार मिळतील. ऑक्सिजन व फायर संबंधाने जिल्हयातील सर्व खाजगी व शासकीय रूग्णालयांचे ऑडीट सुरू असल्यास ते पुर्ण करावे. ऑडीटमधून काही कमतरता समोर आल्यास त्या तातडीने दूर कराव्यात. ऑक्सिजन खुप मौल्यवान त्याची बचत करावी. कुठेही ऑक्सिजन पाईप लाईनला गळती असता कमा नये. खाजगी रूग्णालयांकडून ऑक्सिजनबाबत व फायर ऑडीट झाल्याबाबत प्रमाणित करून घ्यावे. हिवरा आश्रम येथील ग्रामीण रूग्णालय लवकरात लवकर सुरू करावे. ते पुढे म्हणाले, 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाबाबत काही विशेष योजना आखावी. जेणेकरून लसीकरण वेगाने पूर्ण होईल. लसीकरणाचा वेग वाढवावा, 18 वयाच्या पुढे जिल्ह्यातील 21 लक्ष लाभार्थ्यांना लसीकरण करावयाचे आहे. एकूण लोकसंख्येच्या 72.4 टक्के नागरिक लसीकरणाच्या टप्प्यात घ्यावयाचे आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे. जिल्हयातील सर्व नगर पालिका, नगर पंचायत क्षेत्रात विद्युत दाहीनीचा प्रस्ताव सादर करावा. सर्व नगर पालिकांना विद्युत दाहीनी देण्यात येईल. कोविड हॉस्पीटल, कोविड केअर सेंटर येथे भोजन पुरविणाऱ्या कंत्राटदारांचे देयक अदा करावे. ऑक्सिजनचे देयकही अदा करून ॲडव्हान्स द्यायचे असल्यास तर देवून टाकावे. भोजनचा दर्जा चांगला ठेवावा. रूग्णांच्या याबाबत तक्रारी यायला नको. जिल्ह्यातील बेडची उपलब्धता, रिक्त बेड प्रकारानुसार दाखविणारी एखादी वेबलिंक किंवा डॅश बोर्ड तयार करावा. जेणेकरून नागरिकांना बेडची परिस्थिती लक्षात येईल. रूग्णालयाबाहेरही अशाप्रकारचा डॅश बोर्ड कार्यान्वीत करावा. बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, अति. जिल्हाधिकारी धनंजय गोगटे आदींसह उपविभागीय अधिकारी, तहसलिदार उपस्थित होते.
जिल्ह्यातील उपलब्ध बेड व सद्यस्थिती : शासकीय व खाजगी रूग्णालयातील एकूण बेड 5014. यामध्ये आयसीयु 526, वेंटीलेटर 113, ऑक्सिजन बेड 1554, सामान्य बेड 2934.

Related posts

जिल्ह्यात आज प्राप्त 259 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 64 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya

लॉकडाऊन मध्ये आंदोलन करणे भोवले; ३३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

nirbhid swarajya

जिल्ह्यात 94 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 7 पॉझिटिव्ह

nirbhid swarajya
error: Content is protected !!