गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाचा उपाय
बुलडाणा : कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात १९७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील होणारी नागरिकांची गर्दी कमी करणे आवश्यक आहे. या उपायोजनांचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये तरतूदींनुसार जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जिल्ह्यातील नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सर्व दुचाकी, तिनचाकी वाहनांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. तसेच वाहनधारक विनाकारण रस्त्यावर फिरतांना आढळून आल्यास संबंधितांवर ५००० रूपये दंड आकारण्यात येणार आहे.
राज्य तसेच राष्ट्रीय महामार्गाचे काम हे पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक असल्याने सदर कामावर असणारे मजूर यांची ने-आण करता येणार नाही. त्यासाठी त्यांची कामाच्या स्थळीच व्यवस्था करण्यात यावी. तसेच काम करताना सामाजिक अंतराचे पालन करावे. याबाबत सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची राहील. अत्यावश्वयक सेवांच्या होम डिलीवरीबाबत नागरी भागात मुख्याधिकारी नगर परिषद व ग्रामीण भागात मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प यांनी व्यवस्थापन करावयाचे आहे.जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंडसंहीता कलम १८८ नुसार दंडनिय कारवाईस पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशान्वये कळविले आहे.
सौजन्य – Dio Buldana