खामगांव : अवकाळी पावसाने काल जिल्ह्यातल्या काही भागात हजेरी लावली. जिल्ह्यात 17 मार्च ते 19 मार्च या तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. तो अंदाज खरा ठरला असून काल सायंकाळी खामगाव तालुक्यातील काही ठिकाणी गारांसह पावसाच्या सरी बरसल्या आहेत. पावसासोबत बरेचदा गारपीट होत असल्याने कांदा, द्राक्ष,पपई, केळी,हरभरा पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सध्या बहुतेक ठिकाणी गहू , हरभरा पिकांची काढणी झाली आहे तर काही ठिकाणी बाकी आहे.

काल सायंकाळी च्या दरम्यान आकाश भरून आले व काही ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहिला तर काही ठिकाणी जोरदार सरी पडले असून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दोन-तीन दिवसांपासून हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला खामगाव व नांदुरा शेगाव तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. खामगांव तालुक्यातील मांडका, शिरसगाव देशमुख, वर्णा, सारोळा, कारेगाव बु. सह अनेक गावातील शेतामधे नुकसान झाले आहे. यातील मांडका गावात इलेक्ट्रिक पोल सुद्धा पडले आहेत. तसेच वर्णा, सारोळा येथे केळी व पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विहिगाव कारेगाव बु. येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात गारपीटी सह जोरदार पाऊस पडला आहे. शेगाव तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली होती.

या ठिकाणीसुद्धा शेतातील गहू हरभरा व अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांदुरा तालुक्यातील धानोरा व काटी शिवारात नळगंगा प्रकल्पाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात गहू पेरणी केली जाते. यावर्षी एका आठवड्यात पूर्वी पाटाच्या पाण्याची शेवटची पाळी देऊन शेतकरी वर्ग निश्चिंत झाला होता. पण दोन दिवस अचानक झालेल्या वादळ व गारपिटीने शेवटच्या टप्प्यात असलेल्या गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नांदुरा तालुक्यातील धानोरा येथील श्रीमती रंजना राजाराम दांडगे या महिलेचे संपूर्ण घर पडले असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी तहसीलदार राहुल तायडे यांचेशी संपर्क करून रंजना दांडगे यांच्या घराच्या झालेल्या नुकसानाबाबत चर्चा करून तात्काळ निवारा उपलब्ध व्हावा या दृष्टीने महसूल विभागाकडून उपाययोजना करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली.काल मेहकर तालुक्यातील अंजनी बु.येथे वीज पडून एक महिला ठार झाल्याची घटना सुद्धा उघडकीस आली आहे. मेहकर तालुक्यातील अंजनी बु. येथे आपल्या शेतामधील गोठ्यात राहणाऱ्या कासाबाई उत्तम नागोलकर वय ५५ यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी अंजनी बुद्रुक तलाठ्याने तहसीलदार यांना अहवाल सादर केला आहे. जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतामधील गहू, कांदा, केळी, हरभरा व भाजीपाल्यासह बागायती पिकांचे नुकसान होत आहे यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे.