बुलडाणा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत करावयाच्या उपाय योजनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने 21 जुलै 2020 चे आदेशानुसार 21 ऑगस्ट 2020 पर्यंत जिल्ह्यात शनिवार व रविवार दिवशी संपूर्ण संचारबंदी लागू केली होती. मात्र शनिवार व रविवार दोन्ही दिवस संचारबंदी असल्यामुळे शुक्रवारी तसेच सोमवारी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेता तसेच सदर रोगाचा मोठ्या प्रमाणावर होत असलेला संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून 21 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक शनिवारी लागू असलेली संचारबंदी हटविण्यात येत आहे. आता केवळ प्रत्येक रविवार रोजी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू राहणार आहे.
या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बंधाची किंवा सदर आदेशाची अवज्ञा करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना ही भारतीय दंड संहीता च्या कलम 188 नुसार, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 अंतर्गत दंडास पात्र असणार आहे, असे जिल्हादंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात नमूद आहे.