सर्व उद्योग, व्यवसाय आता सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहणार
पिक विमा भरण्यासाठी महा ई सेवा केंद्र, सीएससी केंद्र रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी दि. 21 जुलै ते 21 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण एक महिन्यासाठी 21 जुलै रोजीच्या आदेशानुसार लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार या दिवशी औषधालय, दवाखाने व दुध वितरण, संकलन वगळून इतर सर्व बाबींवर बंदी घालण्यात आली. या दोन्ही दिवशी संचारबंदी लागू केली. सोमवार ते शुक्रवार या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात सर्व उद्योग, व्यवसाय आदी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होते. या वेळेमध्ये आता बदल करण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व उद्योग, व्यवसाय आता सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी सायं 5 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत कडक कर्फ्यु लागू असणार आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी कमी वेळ मिळत आहे, परिणामी शेतकरी पिक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज दाखल करण्यासाठी महा ई सेवा केंद्र, सीएससी केंद्र शनिवार व रविवारसह सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय संचारबंदी लागू असतांना इतर कोणतीही व्यक्ती, वाहने, रस्त्यावर, बाजारामध्ये, गल्लीमध्ये घराबाहेर फिरताना आढळुन आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनीयम 2005, भारतीय दंड संहीता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र अपराध केला असे समजण्यात येईल व पुढील कारवाई करण्यात येईल,असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.