खामगांव : जिल्हा पोलिस दलात पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी फार मोठे बदल केले आहेत. जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्हांतर्गत तर काहींच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहे. अनेक पोलीस निरीक्षकांचे कार्यकाळ संपल्याने सदर प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांची जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदी बदली करण्यात आली आहे.

संपूर्ण खामगाव चे लक्ष लागून असलेले खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या बदलीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून खामगांव शहरासह जिल्ह्यात चर्चा सुरू होती. काही दिवसांपूर्वी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे शेगाव येथे स्व. शिवशंकर भाऊ पाटील यांच्या निवासस्थानी भेट देण्याकरता आले असता, खामगांव मधील काँग्रेसच्या एका माजी लोकप्रतिनिधीने पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्यासमोर ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या बदलीबाबतचा विषय सतेज पाटील यांच्या समोर काढला होता. आता त्या विषयाला पूर्णविराम मिळाला असून ठाणेदार सुनील अंबुलकर यांची बदली झाल्याने त्या माजी लोकप्रतिनिधी चे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले आहे. यामुळे सुनिल अंबुलकर यांच्या राजकीय गेम झाला असल्याची खमंग चर्चा शहरात रंगू लागली आहे. तर खामगाव ग्रामीण यांच्या ठाणेदार पदी सुरेश नाईकनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणार येथील ठाणेदार रवींद्र देशमुख यांची आरएफओ शाखा मूळ पदावर बदली करण्यात आली आहे. तर खामगाव येथील पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या जागेवर बुलडाणा नियंत्रण कक्ष येथील पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी नगर पोलिस स्टेशन येथे बुलडाणा नियंत्रण कक्ष येथून येथील अरुण परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेगाव ग्रामीणचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी यांची बदली खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत की प्रलंबित गुन्हे, तपासाची कागदपत्रे, केस डायरी अर्ज चौकशी व इतर प्रलंबित प्रकरणे पोलीस स्टेशनमधील अन्य अधिकाऱ्यांकडे देऊन बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ हजर राहण्यास सांगितले आहे.