खामगाव-: शेगाव येथील वरवट बकाल रोडवरील सूळ ब्रदर्स यांच्या गौरव हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगाराचा अड्डा सुरू होता.अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने ३ जून रोजी या अड्ड्यावर छापा टाकून ८१ जुगारांना पकडून त्यांच्या जवळून १ कोटी ७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईने जिल्हा पोलीस प्रशासनाला चांगलीच चपराक बसली आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी जिल्ह्यातील ठाणेदारांची बैठक घेऊन अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.तर ठाणेदारांचे रायटर कम वसुली अधिकारी अवैध धंदेवायकांनी तशी सूचना देऊन आदेशाची अंमलबजावणी करीत असल्याची माहिती मिळाली आहे.जिल्ह्यात वरली मटका जुगार अवैध दारू विक्री गांजा विक्री यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर बोकाळले आहेत. ही वस्तुस्थिती आहे संतनगरी शेगाव तर जणू काही अवैध धंद्यांचे माहेरघर बनत चालले आहे.शेगाव येथे तीन चार ठिकाणी जुगाराचे मोठे अड्डे असून पोलिसांच्या हप्ते खोरीमुळे राजरोसपणे सुरू आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्यामुळे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू होते.परंतु गौरव हॉटेल मधील जुगारावर छापा टाकून मोठी कारवाई करण्यात आल्याने स्थानिकच नव्हे तर जिल्हा पोलीस प्रशासनाचे सुद्धा पितळ उघडे पडले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने छापा टाकल्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाची इभ्रत टांगल्या गेली त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी नुकतीच घाटाखालील व घाटावरील ठाणेदार यांची बैठक घेऊन त्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील अवैध धंदे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले असल्याचे समजते
त्या अधिकाऱ्यांची उचल बांगडी करा-सानंदा
शेगाव येथील छाप्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी ज्यांच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू असतील अशा अधिकाऱ्यांची तसेच शेगाव येथील कारवाई पाहता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा उचल बांगडी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निवेदन दिले आहे.
जलंब पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे सुरूच
शेगाव येथील जुगार अड्ड्यावरील कारवाईमुळे जिल्हा पोलीस प्रशासन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी हवेत धंदे बंद करण्याचा फतवा काढला असला तरी जलंब पोलीस स्टेशन हद्दीत मात्र बिनधास्तपणे सुरू आहे. गावांमध्ये वरली मटका,अवैध दारू विक्री,जुगार,राजरोसपणे सुरू आहेत.त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा फतवा जलंब ठाणेदार बारापात्रे यांच्यावर काहीच परिणाम झाला नसल्याचे दिसून येते.