बुलडाणा : काल दिनांक 30 जून रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अप्पर पोलिस अधीक्षक पोकाळे यांच्या निवासस्थानी
साप आढळून आला. तेव्हा कर्तव्यावर असणारे पो. का. अर्जुन सोनुने यांनी सर्पमित्र एस बी रसाळ यांना संपर्क केला असता त्यांनी लगेच अप्पर पोलिस अधीक्षक यांच्या निवासस्थानी पोहचून साप पकडून बंद केला. सर्पमित्र रसाळ यांनी दिलेल्या माहिती नुसार तो साप अत्यंत विषारी असलेल्या कोब्रा या जातीचा होता. यानंतर रात्री
11 वाजता च्या सुमारास बुलडाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या निवासस्थानी पोलिस सुरक्षा गार्ड रूम जवळ सुध्दा साप आढळून आला त्यावेळी पो.ना. प्रदिप मुसदवाले यांनी सर्पमित्र रसाळ यांना कळवले असता ते लगेचच घटनास्थळी पोहोचले व सापाला पकडून बरणी मध्ये बंद केला. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी आढळलेला तस्कर जातीचा बिनविषारी साप होता. काही तासांच्या फरकाने अप्पर पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी साप आढळून आले व सर्पमित्र एस बी रसाळ यांनी समयसूचकता दाखवत दोन्ही साप पकडले व त्यांना जंगलामध्ये सोडून दिले. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर साप निघतात त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता ताबडतोब सर्पमित्रांना माहिती द्यावी असे आवाहन सर्पमित्र रसाळ यांनी निर्भिड स्वराज्य शी बोलतांना केले आहे.