खामगाव : जिल्ह्यात कोविड आजारामुळे बाधीत रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात संचारबंदीचा आदेश जारी केला आहे. संचारबंदीचे आदेश पारीत होताच आज खामगाव येथे जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी स्वत: रस्त्यावर येत कोविड नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरिता संचारबंदी असणार आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी एस रामस्वामी यांनी खामगाव येथे स्वतः रस्त्यावर येत शाळा क्र.६ समोरील दुकानांमधे जाऊन कोविडचे नियम पाळण्याचे आवहन करत काही दुकानावर कारवाई केली.त्यानंर त्यांनी शहरातील आठवड़ी बाजार व विविध भागात जाऊन नागरिकांना व दुकानदार यांना आवहन केले. त्यानंर त्यांनी विश्रामगृहावर अधिकाऱ्यांची बैठक व आढावा घेतला. या बैठकीमधे त्यांनी सांगितले की, शहरी व ग्रामीण भागामध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी, जमावाने एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे. सर्व प्रकारच्या वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या धार्मिक स्वरुपाच्या यात्रा, उत्सव, समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलने कार्यक्रम, सभा, बैठका यासाठी केवळ ५० व्यक्तिंनाच परवानगी देण्यात यावी. मिरवणूक व रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करावी असे आदेशही त्यांनी दिले आहेत. मर्यादेपेक्षा जास्त व्यक्ती दिसून आल्यास आयोजक व मंगल कार्यालय, बॅंक्वेट हॉल, लॉन मालक यांचेवर सुद्धा कडक कारवाई करण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर व सोशल डिस्टसिंगचे नियम पाळणे बंधनकारक करावे. ज्या ठिकाणी नागरीकांची गर्दी होत असल्याचे आढळुन आल्यास स्थानिक प्रशासनाकडून नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्या. त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळुन आल्यास संबंधित व्यावसायिक, दुकानदार यांचेवर कारवाई करावी. खामगांव शहरातील व ग्रामीण भागातील बाजारपेठांमध्ये नागरीकांची गर्दी होणार नाही या बाबत स्थानिक प्रशासन (नगरपरिषद/नगर पंचायत /ग्राम पंचायत) यांनी दक्षता घेवून व आवश्यक पथकाचे गठन करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी असे जिल्हाधिकारी यांनी स्थानिक विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत सांगितले आहे. या बैठकीमधे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार डॉ. शितल रसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.खिरोडकर, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील हुड,आदि उपस्थित होते.
previous post