बुलढाणा-: मराठा सेवा संघाच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात येणाऱ्या जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. यानिमित्त जिजाऊ श्रुष्टी व राजमाताचे जन्मस्थान असलेला राजवाडा नटला असून मुख्य सोहळा १२ जानेवारीला पार पडणार असून खासदार उदयन राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती , मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे मुख्य मार्गदर्शन आणि विविध पक्षीय नेत्यांची मांदियाळी यंदाच्या सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे.दरवर्षी मातृतीर्थ सिंदखेडराजात देश विदेशातील लाखो जिजाऊ भक्तांच्या साक्षीने सोहळा साजरा करण्यात येतो. या सोहळ्याची वातावरण निर्मिती सावित्री-जिजाऊ दशरात्रोत्सवाने झाली आहे. या अंतर्गत ४ ते १० जानेवारी दरम्यान सिंदखेडराजा परिसरातील शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांनी विविध रंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे १० व ११ जानेवारी दरम्यान जिजाऊ गाथा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जिजाऊ श्रुष्टी वर आयोजित या महोत्सवात उद्या बुधवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ४ दरम्यान कीर्तन महोत्सव पार पडणार आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता राजवाड्यावर दीपोत्सव तर त्यानंतर राजवाडा ते जिजाऊ श्रुष्टी दरम्यान मशाल यात्रा काढण्यात येईल.रात्री साडे आठला महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहे.ऍड खेडेकरांचे भाषण ठरले लक्षवेधी १२ तारखेला सकाळी ६ वाजता लखुजीराजे जाधव यांच्या राजवाड्यात महापूजा, ७ वाजता पालखीसह वारकरी दिंडी, ९ वाजता शिवधर्म ध्वजारोहण आणि दुपारी दीड वाजेपर्यंत शाहिरांचे पोवाडे, सत्कार सोहळे, प्रकाशन सोहळे, सामूहिक विवाह सोहळा पार पडणार आहे. प्रदेश कार्यध्यक्ष अर्जुन तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कक्षांचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष हजर राहणार आहे. दुपारी २ ते ६ वाजता शिवधर्म पीठ येथे आयोजित मुख्य सोहळ्यात उदयन राजे भोसले व मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांचे मार्गदर्शन करणार आहे. सडेतोड मत प्रदर्शनासाठी ओळखले जाणारे ऍड खेडेकर यावेळी काय व कसे प्रबोधन करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावेळी विविध पक्षीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये गुलाबराव पाटील, अंबादास दानवे, नानाभाऊ पटोले, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, ज्ञानेश्वर पाटील, राजेंद्र शिंगणे, सुभाष देसाई, संजय कुटे, संजय रायमूलकर, श्वेता महाले, संजय गायकवाड, आकाश फुंडकर, राजेश एकडे, वसंत खंडेलवाल, किरण सरनाईक यांचा समावेश आहे. याशिवाय नगराध्यक्ष सतीश तायडे, मराठा सेवा संघाचे कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, महासचिव मधुकर मेहेकरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
पुरस्कार जाहीर
दरम्यान संघटनेतर्फे दिल्या
जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कांतराव देशमुख यांना मराठा कृषी उद्योजक, स्नेहा कोकणे यांना मराठा क्रीडा भूषण तर ज्ञानेश्वर घोडके यांना मराठा कृषी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.