गेल्या दशकभरात शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये चिमण्यांच्या संख्येत घट होत आहे. चिमणी संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी २० मार्चला ‘जागतिक चिमणी दिन’ साजरा केला जातो.
वाढतं शहरीकरण, परिणामी वाढलेलं काँक्रिटीकरण, कमी होत जाणारा जंगलाचा भूभाग, वाढलेलं मोबाईल टॉवरचं जाळं यामुळे चिमण्यांच्या संख्येवर दिवसेंदिवस प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यातूनच चिमण्या वाचवण्यासाठी काही पक्षीप्रेमी पुढे आले व नोव्हेंबर २००९ पासून चिमणी वाचवण्याची मोहीम सुरू झाली.
माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी म्हणून आपण चिमणीला ओळखतो. पण सध्या शहरात ही चिमणी कमी झाल्याचे दिसून येत आहे. पण गावांत चिमण्यांची संख्या बऱ्यापैकी आहे. शहरात आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्न न मिळणे, पाणवठे नसणे, शहरांमधील वाढते प्रदूषण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या कमी होत आहे. चिमण्यांच्या संख्येबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी २० मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला जात आहे.