खामगाव : जय किसान बाजार समितीमध्ये स्थानिक कामगारांना काम देण्यात यावे याकरिता आक्रमक युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात रवी मोरे यांनी सांगितले आहे की, सध्या कोरोना या भयानक रोगामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तसेच आपल्या तालुक्यात कामगारांच्या वर उपासमारीची वेळ आली आहे. स्थानिक बाजार समिती तसेच उद्योजकांनी योग्य दरामध्ये आपल्या क्षेत्रात स्थानिक कामगारांना काम द्यावे. जय किसान बाजार समितीमध्ये दररोज बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात. शेतकरी स्थानिक आहेत परंतु कामगार हे इतर जिल्ह्यातील असून कमी दरामध्ये काम करण्यास आणल्या जाते. त्यामुळे स्थानिक कामगारांच्या हाताला काम मिळत नाही व स्थानिक कामगारांना त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. सदर बाजार समितीमध्ये निविदा न काढता जिल्हा बाहेरच्या कंत्राटदाराला काम दिले आहे. इतर जिल्ह्यातील व इतर राज्यातील कामगार या बाजार समिती मधे खूप कमी दरामध्ये काम काम करत आहेत, त्यामुळे बाजार समितीचा फार मोठा आर्थिक फायदा झाला आहे. तरी सर्व प्रकरणाची योग्य व तात्काळ दखल घेऊन न्याय देण्यात यावा यासाठी जय किसान बाजार समितीचे व्यवस्थापकांना या प्रकारचे निवेदन सुद्धा दिले होते. सदर निवेदनाची कायदेशीर रिसीव्ह कॉपी मागितली असता त्यांनी दिली नाही व कायद्याचा भंग केला. तरी या सर्व प्रकरणाची योग्य तपासणी करून स्थानिक भूमिपुत्रांना काम मिळवून द्यावे अन्यथा कामगारांच्या हितासाठी १० ऑक्टोंबर पासून जय किसन बाजार समितीसमोर आमरण उपोषणास सुरुवात करणार असल्याचे आक्रमक युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मोरे यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.