भारत गणेशपुरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत संदीप शेळकेंचा निर्धार…
बुलढाणा : सर्व पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. मात्र मी जनतेचा जाहीरनामा मांडणार आहे. तो जनतेच्या पसंतीस उतरला आणि जनतेने आग्रह केला तर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढविणार, असा निर्धार राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीपदादा शेळके यांनी बोलून दाखवला.प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे यांनी संदीप शेळके यांची २७ ऑगस्ट रोजी येथील आराध्या लॉन्समध्ये मुलाखत घेतली. यावेळी विचारलेल्या राजकीय, विकासात्मक प्रश्नांवर त्यांनी सफाईदारपणे उत्तरे दिली. जवळपास दोन तास ही मुलाखत चालली. एरवी हास्य- विनोदाचे फवारे उडविणाऱ्या भारत गणेशपुरे यांनी गंभीरपणे विविध मुद्दे हाताळले. प्रारंभीच्या सत्रात जिल्ह्याचा विकास, विकासाची दृष्टी, अनुशेष यावर जोर दिला. तर विनोदाचे रंग उधळत कार्यक्रमाची रंगत अखेरपर्यंत कायम ठेवली. ‘तुम्ही लोकसभा लढविणार काय आणि कोणत्या पक्षाकडून’ हा रोखठोक सवाल भारत गणेशपुरे यांनी संदीप शेळकेंना विचारला. त्यावर जनता हाच आपला पक्ष राहील, असे शेळके म्हणाले. जनता सोबत असली तर कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. गणेशपुरे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांना प्रश्न विचारले. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.
संवाद यात्रा काढणार
जिल्ह्यातील जनतेला भेटण्यासाठी आपण लवकरच जिल्हापरिषद सर्कल निहाय संवाद यात्रा काढणार आहोत. यादरम्यान नागरिकांच्या सूचना, निर्देश लक्षात घेऊन येत्या दोन महिन्यात जनतेचा जाहीरनामा तयार करणार आहोत. मतदारसंघातील साडेबाराशे गावांत व मतदान केंद्रात समांतर यंत्रणा उभी करण्याचे नियोजन असल्याचे ते म्हणाले.