दे. राजा तालुक्यातील वाकी बु येथील घटना
देऊळगांव राजा : तालुक्यातील वाकी बु येथे पोहण्यासाठी गेलेल्या बालकांमधील दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे तर एक बालक यातून बचावला आहे. या घटनेमुळे संपुर्ण गावात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव राजा तालुक्यातील वाकी बु येथील काकड यांच्या गावानजीकच्या शेतात शेततळे आहे.
या शेततळ्यावर अनेक बालक पोहोण्यासाठी जातात तर आज सकाळी गावातीलच अमर बनसोडे वय १६ व सोहम बनसोडे वय १४ व सुमित बनसोडे हे तिघे शेततळ्यावर पोहोण्यासाठी गेले होते. या तिघांनीही शेततळ्यात उड्या घेतल्या. खाली उडी घेतली त्यानंतर अमर व सोहम हे खोल पाण्यात बुडाले. हा प्रकार बाजूच्या शेतात कोळपणी करीत असलेले मधुकर बनसोडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली त्यामुळे ग्रामस्थांनी शेताकडे धाव घेतली असता यात तिघं नाहीत वाचवण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी सुमितला वाचवण्यास ग्रामस्थांना यश आले परंतु अमर आणि सोहम यांना बेशुद्ध अवस्थेत पाण्याबाहेर काढले व तात्काळ देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे तर सोहम आणि सुमित हे सख्खे भाऊ होते तर अमर हा त्याचा चुलत भाऊ होता या घटनेमुळे वाकी बु या गावात शोककळा पसरली आहे.