चिखली : येथील एका 9 वर्षीय मुलीस पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करुन जबर जखमी करणाऱ्या सागर विश्वनाथ बोरकर व निखील लिंबाज गोलाईत या दोन आरोपींना विशेष न्यायाधीश चित्रा एम. हंकारे यानी दोषी धरून फाशीची शिक्षा आज सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 27 एप्रिल 2019 रोजी रात्री अंदाजे एक ते दोन वाजेच्या सुमारास आरोपींनी अल्पवयीन मुलीला झोपेतच स्कुटीवरुन पळवून नेले, आणि स्मशानभूमी समोरील मोकळ्या जागेत आळी-पाळीने बलात्कार केला होता. पिडीतेची आई वडील अत्यंत गरीब असून आई मतीमंद आहे. असे असतांना चिखली पोलिसांनी ह्या क्रूर बलात्काऱ्यां विरुद्ध कलम ३६६ अ, ३७६ डी.बी. बाल लैंगिक अत्याचार कायदा ६ (पॉस्को) अंतर्गत पोलिसांनी खटला दाखल करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. आई वडील गरीब असतांना कायद्याचे कोणतेही ज्ञान नसतांना एका निष्पाप बालिकेवर केलेल्या अत्याचाराच्या विरोधात पोलीसच मायबाप बनले होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने २०१२ मध्ये मंजुरी दिलेल्या पॉस्को कायद्याच्या अंतर्गत १२ वर्षांपर्यंतच्या बालकांवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरलेल्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल. त्या कायद्या अंतर्गत जम्मू-काश्मीरच्या कठुआ आणि उत्तर प्रदेशच्या उन्नाव येथे दोन सामूहिक बलात्कारानंतर बाल बलात्कार करणाऱ्यास फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यानंतर चिखली येथील बलात्काऱ्यांना दिलेली पॉस्को कायद्यान्वये राज्यातील ही पहिलीच फाशीची शिक्षा असावी.
या प्रकरणाचा प्राथमीक तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यानी केला. त्यानंतरचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी बाबुराव महामुनी यांनी केला. यासाठी पोलिस कर्मचारी शरद गिरी व महिला पोलिस कर्मचारी ज्योती मुळे यांनी सहकार्य केले. तपासाअंती दोषारोप पत्र येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने मुलीस पळवून नेतांना साक्षीदार शिवाजी साळवे, पंच शुभम भालेराव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कदम, डॉ. विजय खरपास, डॉ. मनिषा चव्हाण, डॉ. नुतन काळे, तसेच औरंगाबाद येथील तज्ञ डॉ. विजय कल्याणकर, डॉ. संजय पगारे, जात प्रमाणपत्रावरील साक्षीदार रवी टाले, राजू देशमुख , नायब तहसिलदार कुणाल झाल्टे, तपास अधिकारी गुलाबराव वाघ , उपविभागीय पोलीस अधिकारी महामुनी या साक्षीदारासह पीडीत मूलीचा पुरावा नोंदवण्यात आला.साक्षी पुरावे हे घटनेला पुरक व एकमेकाशी सुसंगत असल्याने पीडित मुलीवर आरोपींनी बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले. प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सरकारी वकील ॲड. वसंत भटकर, ॲड. सोनाली सावजी यांनी काम पाहिले. यासाठी त्यांना पैरवी म्हणून पोलिस कर्मचारी सुनील पवार यानी सहकार्य केले. पीडित मुलीला महिला व बालकल्याण सदस्य किरण राठोड यांनी सहकार्य केले.