लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार नोंद, नितीन गडकरींकडून कौतुक!
सोलापुर : रोज देशभरात ४० किलोमीटर महामार्ग बनविण्याचं नितीन गडकरी यांचं लक्ष्य आहे. मात्र, सोलापूरात एकाच ठिकाणी तब्बल २५.५४ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग १८ तासात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पूर्ण केला आहे. सोलापुरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा एक नवा विक्रम केला असून, या विक्रमाचे कौतुक खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गेल्याच आठवड्यात गडकरी यांनी महामार्गाचे काम गतीपूर्ण पद्धतीने व्हायला हवे, असे आदेश दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने महामार्गाची मक्तेदारी घेतलेल्या लोकांना तशा सूचना दिल्या होत्या. सोलापूर-विजापूर हा महामार्ग ११० किलोमीटर पर्यंत होणार आहे. मात्र त्याचे २५.५४ किलोमीटर रस्त्याचे काम केवळ १८ तासात पूर्ण झाल्यानंतर गडकरी यांनाही आपला आनंद शब्दात मांडता येत नव्हता. ज्या कंपनीकडे या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट होते त्या कंपनीच्या ५०० कामगारांच्या मेहनतीचे देखील गडकरी यांनी कौतुक केले. या अनोख्या विक्रमाचा शिलेदार होण्याचे भाग्य महाराष्ट्राच्या महामार्गाला लाभले आहे. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये केली जाणार असल्याची घोषणा गडकरी यांनी आपल्या ट्विट द्वारे केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही शाबासकीची थाप, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.