खामगाव : नांदुरा रोडवरील लाईफ लाइन हॉस्पीटलचा संचालक असलेला डॉ.आशिष अग्रवाल याने अनधिकृत कोविड सेंटरच्या माध्यमातून रूग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला असून त्यामध्ये काहींचा बळी गेला आहे. यासंदर्भात रूग्ण नातेवाईकांच्या तक्रारीवरून काही प्रसार माध्यमामध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले.
त्यामुळे डॉ. आशिष अग्रवाल याने २७ एप्रिल रोजी रात्री आपल्या भ्रमणध्वनीवरून स्वतःच्या आवाजात ऑडिओ क्लीप व्हायरल करून काही पत्रकारांना संबोधत ठेचून चटणीसोबत खाऊन टाकेल, तुम्हाला माहितही नाही पडणार..आलं का लक्षात!. अशा अशोभनीय भाषेत बोलून जीवघेणी धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. यासंदर्भात पत्रकार आनंद गायगोळ व किरण मोरे यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे ज्या ग्रुप मधे सदरची ऑडियो क्लिप वायरल केली त्यामधे शहरातील मोठे अधिकारी, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक आहेत. त्यामुळे याप्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.