ज्ञानगंगा नदीपात्रात अतिक्रमित शेतीमुळे ज्ञानगंगापुर गावाला धोका – सरपंच महाले
खामगांव: तालुक्यातील ज्ञानगंगापुर गावजवळील ज्ञानगंगा नदीपात्रातील भूखंडावर अतिक्रमण करुन शेती काढल्याने गावाला धोका निर्माण झाला असल्याने ज्ञानगंगापुरचे सरपंच ज्ञानेश्वर महाले व उपसरपंच सुरेश सुर्यवंशी यांनी याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे की, ज्ञानगंगापूर येथील ज्ञानगंगा नदीपात्रातील भूखंडावर अजहर खान याने अतिक्रमण करुन गावाला धोका निर्माण होईल असे शेत काढलेले आहे.
सदर शेती काढताना कुठलीही प्रशासकीय मान्यता न घेता शासनाला पाठीशी घेऊन हे कृत्य केलेले आहे. सरपंच व गावकऱ्यांनी वेळोवेळी तलाठी, मंडळ अधिकारी यांना तोंडी तसेच लेखी स्वरूपात सांगितले होते. परंतू कुठलीही चौकशी न करता उडवा-उडवीची उत्तरे देऊन कोणतीही कारवाई करत नाही आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने नदीला पूर आला असता ज्ञानगंगा नदीपात्राच्या बाजूला असलेले मातीचे पूर्ण टेकड खोदून संपुर्ण जागा ही समांतर केल्यामुळे नदीचा प्रवाह हा ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी शाळा तसेच गावाच्या दिशेने आला होता.
यामुळे संपूर्ण गावकऱ्यांना एकच प्रश्न निर्माण झाला की, अतिवृष्टी च्या काळात नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्यावर काय होईल ? व होणाऱ्या परिणामाला जबाबदार कोण ? असा सवाल गावकरी करीत आहे. तरी सदरील प्रकरणाची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी अन्यथा ग्रामपंचायत व गावकऱ्यांना लोकशाही मार्गाने पुढील मार्ग काढावा लागेल असे ज्ञानगंगापुरचे सरपंच ज्ञानेश्वर महाले यांनी सांगितले आहे. सदर निवेदन देताना ज्ञानगंगापुरचे उपसरपंच व बाकी सदस्य उपस्थित होते.