बुलडाणा : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर पाळण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना त्यांच्या खरीप हंगामासाठी बी-बियाणे व खते खरपोच देण्याची घोषणा सरकार ने केली होती. मात्र बुलडाणा जिल्ह्यात ही सुविधा उपलब्ध झाली नसल्याने शेतकर्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देश थांबला आहे. मात्र या देशासाठी जगाच्या पोशिंद्या ला थांबता येत नाही, त्यामुळे सुरक्षित राहूनच शेतकऱ्याने आपल्या शेतीच्या मशागती आटोपल्या असून खरीप हंगाम तोंडावर आला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये या अनुषंगाने त्यांना घरपोच बी बियाणे आणि खते देण्याची घोषणा सरकार ने केली होती. मात्र ही सुविधा अद्याप ही सुरू झाली नाही तर जिल्ह्यात ११८४ कृषी केंद्र आहेत त्यामधील काही कृषी केंद्रच सुरू असल्याने शेतकऱ्यांचा संभ्रम वाढत आहे.
लॉकडाऊन संपल्यानंतर बी बियाणे आणि खतांचा तुटवडा पडतो की काय या चिंतेत सध्या शेतकरी पडला असून कृषी केंद्रावर एकच गर्दी झाल्यास हे धोकादायक ठरू शकते त्यामुळे शासनाने घरपोच सेवा देण्याच्या निर्णयाचे स्वागतच असून या आदेशाची त्वरित अंमलबजावणी केल्यास शेतकऱ्याचा संभ्रम दूर होईल आणि कोरोनाचा प्रादुर्भाव देखील वाढणार नाही. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी त्वरित बी बियाणे आणि खते घरपोच पुरवण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.