महिलांच्या आक्रमक पवित्र्याने प.सं. परिसरात खळबळ
खामगाव: घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने तालुक्यातील पारखेड येथील महिलांनी आज आक्रमक पवित्रा घेत थेट खामगाव पंचायत समिती गाठून बिडीओंना घेराव घातला. अचानक झालेल्या या आंदोलनाने पं. स. परिसरात खळबळ उडाली होती. गेल्या अनेक वर्षापासून गावात घरकुलाची कामे मंजूर होतात मात्र गरजुंपर्यंत घरकुलाचा लाभ पोहोचत नसल्याची ओरड या महिला शक्तीकडून करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये घरकुलाचा पहिला हप्ता मिळालेला आहे. मात्र अजूनही घरकुलाच्या इतर हप्त्याचे पैसे न मिळाल्याने अनेकांना आपल्या हक्काचे घरकूल बांधता आले नाही. या संपूर्ण समस्या घेवून पारखेड येथील महिला आज पंचायत समितीवर धडकल्या. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी यांना घेराव घालून आक्रमकपणे आपल्या समस्या मांडल्या. बिडीओ यांनी महिलांचे म्हणणे ऐकून घेत समस्या सोडविण्याचे सांगितले. यावेळी या महिलांनी गरजुंना घरकुलाचा लाभ मिळावा, घरकुलाची प्रकरणे त्वरित मंजूर करावी, प्रलंबित घरकुलांचा हप्ता देण्यात यावा, अशा मागण्या लावून धरल्या. या आंदोलनात अनेक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांच्या या आंदोलनाने एकच खळबळ उडाली होती.