खामगाव:- खामगाव विभागातील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन केले आहे. शहरात कोरोना चा प्रादुर्भाव वाढलेला असताना कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन करण्याचे काम थांबविल्याने आज शहरामधे कचरा उचलला गेला नाही. कोणाच्या काळात घंटागाडी कर्मचाऱ्यांनी कचरा संकलन करणे गरजेचे आहे असे असले तरी घंटागाडी ठेकेदार कर्मचाऱ्यांना मास्क,हात मोजे सॅनीटाईजर आदी सुविधा उपलब्ध करून देत नाही. गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणांवरून नव्याने नियुक्त केलेल्या सुपरवायझर व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येत आहे.खामगाव शहरामध्ये एकूण 106 घंटागाडी कर्मचारी व सफाई कर्मचारी काम करत असून पुण्याच्या डीएम ग्रुप कडे तसेच नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार तक्रारी देऊनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप घंटागाडी कर्मचाऱ्यांनी केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी पगार मागितला त्यांनासुद्धा कुठलीही पूर्वसूचना देत न देता कामावरून कमी करण्यात येत आहे. तसेच काही महिला कर्मचारी यांच्याकडून पगार 250 रु दिवस ठरला असून सुद्धा त्यांना 150 रु देण्यात येत आहे. मागील आठवडयात झालेल्या पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीमधे माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी सफाई कर्मचारी यांना कुठलीही सुरक्षा देण्यात येत नाही असा मुद्दा उचलला होता, त्यावेळी नगरपरिषद चे मुख्याधिकारी बोरीकर यांनी तात्काळ त्यांना योग्य त्या सुविधा पुरवण्यात येतील असे सांगितले होते.मात्र अजूनही त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही वस्तुंचे वितरण केले नाही आहे. घंटागाडी व सफाई कर्मचारी यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण व न प चे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या सोबत चर्चा करुन तात्काळ यांच्या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. यानंतरही जर आमच्या मागण्या पुर्ण नाही झाल्या तर याहुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे घंटागाडी व सफाई कर्मचारी यांनी सांगितले.