अकोला : हावड्यावरून मुंबईकडे जाणारी गीतांजलि एक्सप्रेस अकोला जिल्ह्यातील बोरगावमंजू नजीक रुळावरुन घसरलीये. ट्रेन क्रमांक ०२२६० गीतांजली एक्स्प्रेसचा मागील डबा रुळावरून घसरल्याने उप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णतः थांबून गेलीय.गीतांजली एक्सप्रेसचे मागचे स्टोअर आणि गार्ड डब्बे रूळाखाली घसरले आहेत. या गाडीचा मागील डबा घसरताच मोठा आवाज आल्याने प्रवाश्यांची मोठी तारांबळ उडाली होती. या अपघातावेळी अकोल्याकडे जाणारी दुसरी रेल्वे गीतांजली एक्सप्रेसला अगदी घासून गेल्याची माहिती प्रवाशांनी दिलीये. मात्र यावेळी मोठा अनर्थ टळलाय. सुदैवाने यात सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी रेल्वे अधिकाऱ्यांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर घसरलेल्या डब्याला पुन्हा रुळावर आणण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून होत आहे. सध्या अकोल्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक सध्या थांबवण्यात आली आहे.