जळगाव जा. : कोरोना या विषाणुच्या महाभयंकर आजाराचे गांभीर्य लक्षात घेता देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये असणारा मर्यादित रक्तसाठा पाहता जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द येथील जागरूक तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित येऊन गाडेगाव खुर्द येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये गाडेगाव खुर्द,अकोला खुर्द,गाडेगाव बु.तसेच आजुबाजुच्या उत्साही व जागरूक तरुण, युवक-युवती,महिला व पुरुषांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.अतिशय कमी लोकवस्तीच्या या छोट्याश्या गावामध्ये 53 रक्तदात्यांनी रक्तदान करून गावामध्ये व परिसरातील इतर गावामध्ये रक्तदानाचा नवीन पायंडा घातला आहे.आजच्या कार्यक्रमास रक्तदात्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी सौ.पाटील मॅडम,गटविकास अधिकारी श्री.भारसाकळे ,विस्तार अधिकारी श्री.मोरे, पिंपळगाव उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री निकस ,सामान्य रुग्णालय खामगाव चे श्री.मुंडे ,शिंदे मॅडम, ग्रामसेवक श्री.काळंगे ,परिचारिका सौ.धामट ताई,सरपंच सौ.डाबेराव ताई, गावातील सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक तसेच संपुर्ण गावकरी उपस्थित होते.