वंचित बहुजन आघाडी मिळवून देणार हक्क ; सहभागी होण्याचे अशोक सोनोने यांचे आवाहन
खामगाव : गायरान,अतिक्रमण जमीनधारकांना शासनाने नोटीसा बजावल्या असून याला उत्तर देण्यासाठी तसेच गायरान,अतिक्रमण जमिनीचे पट्टे नावाने होण्यासाठी ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे येत्या २० जुलै रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. वंचीत बहुजन आघाडी अतिक्रमण धारकांना त्यांचा हक्क मिळवून देणार असल्याने या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे पार्लमेंटरी बोर्ड सदस्य तथा भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केले.गायरान, अतिक्रमण जमिनीचे पट्टे नावाने होण्यासाठी येत्या 20 जुलै रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने मोर्चात सहभागी होण्यासाठी स्थानिक बाजार समितीच्या टीएमसी यार्ड येथे अतिक्रमण धारकांच्या बैठकीचे आयोजन 3 जुलै रोजी करण्यात आले होते.यावेळी पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष शरद वसतकार, जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विशाखा सावंग, डॉ.अनिल अमलकार, बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, संचालक राजेश हेलोडे, तालुकाध्यक्ष प्रभाकर वरखेडे,अमोल शेगोकार, दादाराव हेलोडे, रमेश गवारगुरु, प्रकाश दांडगे, रत्नमाला गवई, बाळू मोरे, बाबूराव इंगोले, मनोहर जाधव, उपस्थित होते. पुढे बोलताना अशोक सोनोने म्हणाले की, राज्यातील ३५८ तालुक्यातील २ लाख ४७ हजार अतिक्रमणधारकांना शासनाने नोटीसा पाठवल्या आहेत. यामुळे कसत असलेली शेती व घर उध्वस्त होणार आहे. हे वाचविण्यासाठी नगरपालिका, महानगरपालिका व ग्रामपंचायत क्षेत्रातील अतिक्रमणधारकांनी त्यांची शेती व जागा नियमित करण्याच्या मागणीसाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर देत असलेल्या रस्त्यावरील लढ्यात सहभागी व्हावे. तुमच्या मुलाच्या भविष्याच्या प्रश्नासाठी ही लढाई असून सर्व अतिक्रमण धारकांनी मुंबई येथील मोर्चात सहभागी व्हावे जेणेकरून शासनावर दबाव टाकता येईल असेही अशोक सोनोने यांनी सांगितले.
ॲड.बाळासाहेब आंबेडकर आमचा अधिकार मिळवून देतील – गणेश चौकसे
गेल्या ४० वर्षापासून गायरान जमिनी व अतिक्रमण आमच्या ताब्यात आहे त्यामुळे त्याच्यावर आमचाच अधिकार आहे. गायरान जमीन व जागेचे अतिक्रमण नावावर करून देण्यासाठी ॲड. बाळासाहेब आंबेडकर आमचा अधिकार मिळवून देतील असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे यांनी व्यक्त केला. सध्या रातोरात सरकार बदलत असल्याने येणारा काळ वंचित बहुजन आघाडीसाठी “अच्छे दिनाचा” राहणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.येत्या २० जुलै रोजी मुंबई येथे निघणाऱ्या मोर्चात अतिक्रमण धारकांनी आपल्या हक्कासाठी सहभागी व्हावे असे आवाहन गणेश चौकसे यांनी यावेळी केले.