शेगाव : तालुक्यातील एका गावातील महिलेचा वाईट उद्देशाने विनयभंग केल्याप्रकरणी गायगाव बुद्रुक येथील विद्यमान उपसरपंच विश्वास महादेव सोनोने विरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. याबाबत शेगाव ग्रामीण पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेने ग्रामीण पोलिस स्टेशनला तक्रार दिली की, गायगाव बुद्रुक ग्रामपंचायतचा उपसरपंच असलेल्या विश्वास महादेव सोनोने वय तीस वर्ष याने विनयभंग करून त्याला हटकले असता शिवीगाळ केली व जीवाने मारण्याची धमकी दिली तसेच माझे जेठ यांना खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. अशी फिर्याद पीडित महिलेने दिल्यावरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी उपसरपंच विश्वास महादेव सोनोने विरुद्ध कलम ३५४,३५४ अ ५०४,५०६ भादंवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगांव तालुक्यातील गायगाव बुद्रुक येथील उपसरपंचा विरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल झाल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड अशी खळबळ निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी अधिक तपास शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे बीट जमदार पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानदेव ठाकरे हे करीत आहेत.