मुंबई : रामायण, महाभारत या ऐतिहासिक मालिका पुन्हा सुरू झाल्यानंतर आता प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे.
येत्या ३० मार्चपासून ही मालिका पुन्हा सुरू होत आहे. ३० मार्च रोजी मालिकेचा पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होईल. दुपारी ४ वाजता ही मालिका प्रसारित होईल. त्यानंतर दररोज ४ ते ८ या वेळेत ही मालिका झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या मालिकेत अभिनेते अमोल कोल्हे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली आहे. कमी कालावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवलं आहे.