खामगाव : खासगी कोचिंग क्लासेस बंद असल्यामुळे या ठिकाणी काम करणारे शिक्षक यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. तसेच क्लासेस चालविणारे आर्थिक अडचणीत आले आहेत. तरी कोविड नियमांचे पालन करत खासगी कोचिंग क्लासेस तसेच शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आज खासगी कोचिंग क्लासेस संघटनेच्यावतीने एसडीओ मार्फत मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, कोरोना काळात इतर व्यवसाय करण्यास मुभा आहे. मर्यादीत उपस्थितीत लग्न समारंभाना मुभा आहे. आमदार, खासदारांच्या कार्यक्रमाकरिता परवानगी मिळू शकते. मग खासगी कोचिंग क्लासेसलाच बंदी का? गेल्या वर्षभरापासून कोचिंग क्लासेस व शिकवणी वर्ग बंद असल्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची पाळी आली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी काही शिक्षकांना भाजीपाल विकावा लागत आहे. तर काही खासगी शिकवणी घेणारे शिक्षक खोदकामावर जात आहे. ही अतिशय खेदाची बाब असून त्यांच्या उपजिविकेचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कोचिंग क्लासेस बंद असल्याने कोचिंग क्लास संचालकही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तरी या सर्व बाबींचा विचार करून कोविड नियमाचे पालन करत तसेच काही नियम घालून देत नासगी कोचिंग क्लासेस तसेच शिकवणी वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अन्यथा सर्व खासगी शिकवणी शिक्षक आमरण उपोषण करतील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संघटनेचे प्रदेश संघटक प्रा.अशोकबापू देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर, प्रदेश सदस्य प्रा.विनोद पहाड,जिल्हा वर्कीग प्रेसिडेंट प्रा. प्रशांत देशमुख,तालुकाध्यक्ष प्रा. सतिष रायबोले यांच्यासह अनेक शिक्षकांच्या सह्या आहेत.
previous post
next post