माजी आमदार सानंदा यांनी गृहमंत्री यांना लिहिले पत्र दारू विक्री केंद्रांच्या जागेचाही उल्लेख
खामगाव : कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ३१ एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन घोषीत केले आहे. यामध्ये सर्वत्र संचारबंदी असतांना बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव शहर व परिसरात खुलेआम देशी-विदेशी दारु व बियरची अवैधरित्या चढ्या भावाने विक्री सुरु असल्याचा असल्याची तक्रार माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. उल्लेखनीय म्हणजे केलेल्या तक्रारीत शहरात कोणकोणत्या जागी अवैध दारू विक्री केल्या जात आहे याचा उल्लेखही तक्रारीत केला आहे.
दिलेल्या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे कि, खामगांव शहरातील महाकाल चौक, दालफैल या भागात मध्यप्रदेश येथून आणलेल्या नकली दारुची लहान मुलांच्या हाताने विक्री केली जात आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या सिमेलगतच मध्यप्रदेशची सिमा असून तेथून छुप्या पध्दतीने शहरातील दारुचे व्यवयास करणारे काही व्यावसायिक खामगांवात मोठा दारु साठा आणुन त्याची गैरकायदेशीर विक्री करीत आहेत. मध्य प्रदेशातून बॉर्डर मार्गे नकली दारु आणणारे मोठे रॅकेट सक्रीय असून मध्यप्रदेशातून येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी होणे गरजेचे असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून खामगांव शहरातील एम.आय.डी.सी. भागातील ट्रान्सपोर्ट नगर, बाळापूर नाका, अकोलाबायपास, सजनपुरी बायपास या ठिकाणी सुध्दा खुलेआम दारुची विक्री सुरु असून राज्यउत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशी-विदेशी दारुच्या दुकानांना सिल लावल्यानंतर देखील खामगांव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारुचा व्यवसाय सुरु आरोप सानंदा यांनी केलं आहे. अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने संचारबंदी दरम्यान खुलेआम देशी-विदेशी दारु व बियरची अवैधरित्या चढ्या भावाने विक्री सुरु आहे.
देशावर आर्थिक संकट असतांना खुलेआम दारु विक्री करणे हीबाब मानवतेला काळीमा फासणारी असल्याचे व या तक्रारीच्या प्रतीलीपी सुध्दा त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक यांना दिल्या आहेत असे त्यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलतांना सांगितले.
