October 6, 2025
खामगाव गुन्हेगारी जिल्हा बातम्या बुलडाणा महाराष्ट्र विदर्भ

खामगाव: पोलीस ‘दादा’चे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’! तीन गाड्यांना दिली धडक,वाहनांचे लाखोंचे नुकसान…

खामगाव : खामगाव येथील एका पोलीस दादाने शुक्रवारी घशाची तहान यथेच्छ भागविली अन मग आपले वाहन जमेल तसे चालवत तीन वाहनांना धडक दिल्यावर शेवटी त्याच्या ताब्यातील शासकीय वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरला धडकवले! यात सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. आता नागरिकांना ड्रंक अँड ड्राईव्हच्या बाबतीत दंड करून उपदेशाचे डोस पाजणारा पोलीस विभाग या ‘सलमान’ विरुद्ध काय कारवाई करतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.शुक्रवारी( दि १८) रात्री उशीरा हा धुंदफुंद घटनाक्रम घडला. प्रारंभी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची चर्चा होती. मात्र त्यानंतरच्या तपासात ‘ कैलासच्या राणा ‘ चे आशीर्वाद असलेल्या या पोलीस दादाचा पराक्रम बाहेर आला.वेगळ्याच धुंदीत असलेल्या या बहादूराने ठाण्याच्या जीपने तीन वाहनांना धडक दिल्याचे समोर आले. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून या पोलीस कर्मचाऱ्याने तीन वाहनांना धडक दिली. हा पोलीस कर्मचारी कैलास हटकर खामगाव येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.तो शेगाव खामगाव रोडवर वाहन चालवत असताना नियंत्रण सुटले आणि त्याने ३ वाहनांना धडक दिली. नंतर त्याच्या ताब्यातील वाहन डिव्हायडरला जाऊन आदळलं. या अपघातामध्ये तिनही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. मात्र एवढा गंभीर प्रकार होऊन सुद्धा या प्रकरणात पोलीस प्रशासनाच्या वतीने अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नसून कर्मचाऱ्या विरुध्द सुद्धा अद्याप काहीच कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नव्याने रुजू झालेले अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.तसेच “ड्रंक अँड ड्राईव्हच्या” केसेस पोलीस प्रशासनाच्या वतीने केल्या जातात, याबाबत मोठी जनजागृतीही केली जाते.मात्र,पोलीस प्रशासनाकडूनच असे अपघात घडत असतील तर सर्वसामान्यांवर वचक राहील का? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत.

Related posts

भवानी ग्रुप जनसेवी परिवाराचा ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ उपक्रम ठरतोय कोरोना पासून बचावाचे कवच

nirbhid swarajya

आपल्या खामगावच्या विद्यार्थ्यांचा शितल अकॅडमीच्या माध्यमातून राज्यस्तरावर यश…

nirbhid swarajya

बुलडाणा जिल्‍ह्यात आजपासून संचारबंदी लागू

nirbhid swarajya
error: Content is protected !!