खामगाव: शहरात प्रथमच तीर्थ शिवराय इतिहासाचे दर्शन घडविणारा कार्यक्रम आयोजित एकाहून एक सुरेल आणि शिवभक्तिमय पोवाडे,गोंधळ अशा विविध गीत प्रकारातून,दर्जेदार संगीत,शास्त्रीय नृत्य प्रदर्शन व शिवकालीन युद्धकलेचे अप्रतिम नमुने पाहायला मिळाले.श्रीहरी लॉन्स येथे संपूर्ण शिवमय वातावरणात छत्रपती श्री शिवरायांना समर्पित असा ‘तीर्थ शिवराय’ हा भव्य दिव्य सोहळा पाहायला मिळाला.तीर्थ शिवराय या संगीतमय चरित्रपटाचे आयोजन गुरुवर्य श्री वसंत महाराज ‘अन्नकुटी’ परिवार व श्री संत सेवा संघ यांच्या विद्यमाने आपल्या खामगाव येथे करण्यात आले.यामध्ये डॉ.निखिल पाठक यांनी लिहिलेली सर्व गीते व संगीत जीवन धर्माधिकारी यांनी दिले.अभिजीत पंचभाई, हरिदास शिंदे,चंद्रशेखर महामुनी यांनी या कार्यक्रमास आपल्या स्वरांनी एक वेगळाच रंग भरला.याप्रसंगी येथे सव्यसाची गुरुकुल, वेंगुर्ले येथून युवा पुरस्काराने सन्मानित, दांडपट्ट्याने दोन मिनिटात अडीच हजार लिंब कापणारे म्हणून लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्यांनी आपले नाव नोंदवले आहेत असे श्री लखन जाधव यांनी आपल्या युद्ध कलेचे नमुने व मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले. श्री विजय दादा खुटवड यांनी निवेदनाचे कार्य अतिशय समर्थपणे पार पाडले.या सर्व कार्यक्रमाचे श्रेय श्री संत सेवा संघाचे संस्थापक पूजनीय श्री संजय गोडबोले गुरुजी,श्री हरी लॉन्सचे दामोदर पांडे,कैलास लाईट हाऊसचे कैलास गुरव, गुरुकृपा एलईडी चे सुनील राजपूत व अन्नकुटी परिवार यांना जाते.असे कार्यक्रम आपल्या खामगावात होणे अपेक्षित आहे,यातून समाज प्रबोधनाचे कार्य घडते.या कार्यक्रमाने जनमानसात मनामनात सुराज्याची ठिणगी पेटवली.शिवभक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.