खामगाव– शहरात भाजीपाला हर्राशी दरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्याने शहरातील भाजीपाला हर्राशी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून तसे पत्र न.प. मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी आज निर्गमित केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र जीवनावश्यक वस्तू म्हणून भाजीपाला विक्री सुरू आहे. पण खामगाव शहरात दररोज पहाटे भरणाऱ्या भाजीपाला हर्राशी दरम्यान सर्रासपणे सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत आहे. प्रशासनाने वारंवार सूचित करूनही या हर्राशीत कुठलीही सोशल डिस्टन्सिंग पाळली जात नाही.याबाबत आलेल्या तक्रारी वरून मुख्याधिकारी बोरीकर यांनी याआधीच तेथील अडत व्यापाऱ्यांना खडसावले होते तरीही काहीच फरक पडला नाही दरम्यान मुख्याधिकारी यांनी आज पहाटे स्वतः हर्राशीत जाऊन पाहणी केली असता त्यांना याठिकाणी प्रचंड गर्दी दिसून आली कुणीही सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे निदर्शनास आले.
यावेळी त्यांनी काही अडत व्यापाऱ्यांची चांगलीच कान उघडणीही केली तसेच कोरोनाच्या दृष्टीने अशी गर्दी होणे अतीशय धोकादायक असल्याने त्यांनी खामगावातील भाजीपाला हर्राशी बंद करण्याचा निर्णय घेऊन तसे पत्र निर्गमित केले. यानुसार पुढील आदेशापर्यंत शहरातील भाजीपाला हर्राशी बंद राहणार आहे. कुणीही याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असे, मुख्याधिकारी बोरीकर यांनी सांगितले.