पोलीस, नगर पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग देत आहेत भेटी
खामगांव : बुलडाणा जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील ३ दिवसांमध्ये 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने आणखी नवीन रुग्णांची संख्या वाढल्यास जिल्ह्यात जागा उपलब्ध करून देण्यासाठी खामगावात मागील दोन दिवसांपासून खाजगी रुग्णालयामध्ये महसुल ,पोलीस, नगर पालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग, बांधकाम विभाग भेटी देत असून आपत्कालीन स्थितीसाठी रुग्णालये अधिग्रहित केली आहे.
राज्यात दिवसेंदिवस करोना बाधितांची वाढती संख्या पाहता आपत्कालीन स्थिती उद्भवू शकते असे गृहीत धरून प्रशासनाने उपाययोजना करण्यास प्रारंभ केले आहे. यात बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार शीतलकुमार रसाळ, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर, निवासी वैद्यकीय अधिकारी निलेश टापरे तालुका आरोग्य अधिकारी खिरोडकर, बांधकाम विभागाचे पुंडकर,शहर पोलिस स्टेशन ठाणेदार अंबुलकर यांनी शहरातील महसुल, नगर पालिका मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी आणि डॉक्टर्स यांनी लाईफ लाईन हॉस्पिटल, सिल्वरसिटी हॉस्पिटल, तुळजाई हॉस्पिटल, होमिओपॅथिक कॉलेज हॉस्टेल, गो. से. कॉलेज हॉस्टेल, पॉलिटेक्निक कॉलेज हॉस्टेल इत्यादी ठिकाणांची पाहणी केली. तेथील जागा अत्यावश्यक काळासाठी अधिग्रहित करीत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांमध्येही सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने कारवाईस प्रारंभ केला आहे. रुग्णालयांमध्ये ‘आयसोलेशन बेड’ आणि ‘आयसीयू’ बेडची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने हि प्रयत्न केले जात आहे.
करोना बाधितांची वाढणारी संभाव्य संख्या तसेच त्यावर उपचार करण्यासाठी आवश्यक यंत्रणेचा विचार केला असून, त्यामध्ये खासगी हॉस्पिटलचाही समावेश असावा, असे गृहीत धरले आहे. त्यानुसार शहरातील रुग्णालयांशी संपर्क केल्यानंतर त्यांच्याकडे उपलब्ध होणारे ‘आयसोलेशन’ आणि ‘आयसीयू’ बेडची संख्या गृहीत धरून तसा अहवाल जिल्ह्याकडे पाठविला आहे. अशी माहिती खामगाव उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी निर्भिड स्वराज्य सोबत बोलताना दिली.