खामगांव : आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त येथील सामान्य रुग्णालयात परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नर्स… असा आवाज दिला की रुग्णांसाठी प्रत्येक परिचारिका धावून जातात. रुग्णाला प्रथमोपचार देण्याची जबाबदारी त्या पार पाडतात. रुग्णांच्या वेदनेवर मायेची फुंकर घालतात. गेल्या १४ महिन्यापासून त्यांना कोरोना संकटाला सामोरे जावे लागत आहे. या लढ्यातही परिचारिका एक पाऊल पुढे आहेत. संसाराचा गाडा ओढताना अनेक ब्रदर, परिचारिका, अधिपरिचारिका, अधिपरिचारक, इंजार्ज सिस्टर म्हणून रुग्णसेवेचे व्रत पार पाडत आहेत. रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस दरवर्षी जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. कोणत्याही रुग्णालयातील रुग्ण हा डॉक्टरांपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची परिचारिका या अहोरात्र सेवा करीत असतात. रुग्णाला सकारात्मकता प्रदान करण्याचे, त्यांना आनंद देण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत असतात. आताच्या घडीलाही कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. कुटुंबांची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र झटून परिचारिका आपली सेवा अत्यंत चोखपणे बजावत आहेत. अनेक रुग्णालयातील परिचारिकांनी तर गेले कित्येक दिवस आपल्या घरीदेखील वेळ देऊ शकत नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात परिचारिकांचे योगदान अमूल्य असेच आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्णत्वास जाऊ शकत नाही. परिचारिकांना आजही अनेक समस्या भेडसावत आहेत. मात्र, तरीदेखील रुग्णसेवेला प्राधान्यक्रम देत त्या रुग्णांची सेवा करीत आहेत. हजारो परिचारिका वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहेत.आज येथील सामान्य रुग्णालयात डॉ. निलेश टापरे यांच्या उपस्थिती मधे आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तसेच मेंणबत्या लाऊन परिचारिका दिन या निमित्त शपथ घेण्यात आली.यानंतर डॉ टापरे यांनी सर्व परिचारिकाना शुभेच्छा दिल्या. यावेळी सामान्य रुग्णालयातील सर्व परिचारिका, अधिपरिचारिका उपस्थित होत्या.
next post